आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:सिल्लोड तालुक्यातील 42 सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण ; निवडणूक प्रक्रिया आता दोन महिन्यांत पूर्ण करणार

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड तालुक्यातील ४२ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित २६ सोसायट्यांची निवडणुका येत्या दोन महिन्यांत पूर्ण होतील, असे सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ग्रामीण भागात विविध कार्यकारी सोसायटीच्या पदाला मानाचे पद मानले जाते. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून कार्यकाळ समाप्त झालेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घ्याव्या म्हणून ग्रामीण भागातून विविध गावांतील सभासदांची ओरड सुरू होती. मुदत संपल्यानंतर दोन वर्षे कोरोना काळ असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर यंदाच्या सुरुवातीला विविध सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. त्यानुसार तालुक्यातील संबंधित सहायक निबंधक यांनी सोसायट्यांच्या याद्या अंतिम करून निवडणूक प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार गेल्या आठवड्यापर्यंत तालुक्यातील ४२ विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या ११ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तर १५ विविध कार्यकारी सोसायट्यांच्या याद्या आल्या नंतर आगामी दोन महिन्यांत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील, असा विश्वास मातेरे यांनी बोलून दाखविला. सिल्लोड तालुक्यात एकूण ६८ विविध कार्यकारी सोसायट्या आहेत यापैकी मागील सहा महिन्यांपासून तालुक्यातील ४२ सोसायट्यांच्या निवडणुका घेऊन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित २६ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया आगामी दोन महिन्यांत पूर्ण होण्याची पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील पंधरा गावांतील गाव पुढाऱ्यांनी एकत्रित येऊन सामंजस्याने पंधरा गावांतील सोसायट्या बिनविरोध करण्यात यश मिळविले. आतापर्यंत झालेल्या ४२ विविध कार्यकारी सोसायट्यांपैकी भराडी, चांदापूर, गव्हाली तांडा, सारोळा, सावखेडा, चिंचवन, पेंडगाव, कासोद, कोटनांद्रा, तळणी, भायगाव, बोरगाव (सारवणी), बोरगाव बाजार, भवन व चारनेरवाडी या पंधरा सोसायट्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने याचा इतर सोसायट्यांनी आदर्श घेण्याची गरज आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटी निवडणुकांमध्ये रस घेतल्याने काही गावांच्या सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधकांकडून प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला गेला.अनेक ठिकाणच्या सोसायटी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सभासदांना लक्ष्मी दर्शनाचा लाभ झाला. अनेक गावांत सर्व पक्ष एकत्र येत लढले, काही बिनविरोध एकेकाळी “खायाला सोसायटी आणि फिरायला फटफटी’ अशी म्हण प्रचलित होती परंतु आता व्यवहारात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आल्यामुळे ही म्हण इतिहास जमा झाली आहे. निवडणुका पार पडलेल्या ४२ सोसायट्यांपैकी कोणत्या राजकीय पक्षांकडे किती सोसायट्या आल्या याबाबत तालुक्‍यातील चारही प्रमुख पक्षांकडे आकडेवारी उपलब्ध नाही. अनेक सोसायट्यांमध्ये सर्वच पक्षांना एकत्रित घेऊन बिनविरोध प्रक्रिया पार पडलेली असल्याने कोण्या एका पक्षाचा अधिकार त्यावर सांगता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...