आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम:राष्ट्रवादीकडून चव्हाणांची जय्यत तयारी; भाजपचे बोराळकर, घुगे, शितोळेही स्पर्धेत

शेखर मगर | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वंचित आघाडी-बसपाही उमेदवार देणार, राष्ट्रवादीला यंदा शिवसेनेची साथ

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. राजकीय व प्रशासकीय पातळीवरही जय्यत तयारी सुरू झाली आहे. गेल्या दाेन टर्मपासून या विभागाचे विधान परिषदेत नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यंदा हॅट््ट्रिक साधण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत, तर त्यांच्यासमाेर तगडा प्रतिस्पर्धी उभा करून हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडूनही डावपेच आखले जात आहेत. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नसला तरीही मतदार नोंदणीसाठी हा पक्ष परिश्रम घेत आहे.

सन २००८ व २०१४ या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विजयी झाले. २० जून २०१४ राेजी मतदान झाले, मात्र १७ दिवस आधीच म्हणजे ३ जून राेजी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याने भाजपच्या गाेटात दु:खाचे वातावरण हाेते. या परिस्थितीत सतीश चव्हाण यांनी सुमारे १५,१८८ मतांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा पराभव केला होता. आता बोराळकर भाजपचे मतदार नोंदणी अभियान प्रमुख आहेत, तर प्रवीण घुगे सहायक प्रमुख आहेत. दोघांकडेही संभाव्य उमेदवार म्हणूनच पाहिले जात आहे. ‘पदवीधरांचा निर्धार, चळवळीतलाच आमदार’ असे ब्रीद घेऊन घुगे यांनी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बोराळकर यांच्याविरोधातच शड्डू ठोकला आहे. दोघांनीही मतदार नोंदणी आणि संपर्क अभियानावरच भर दिला आहे. विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य व देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनीही जोरदार तयारी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपच्या मराठवाडा उद्योग आघाडीचे संयोजक समीर दुधगावकर यांनीही तयारी सुरू केली आहे. परभणीचे माजी खासदार गणेशराव दूधगावकर यांचे ते पूत्र आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून सम्यक विद्यार्थी आंदोलनचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष प्रकाश इंगळे यांनी तयारी केली आहे. रिपब्लिकन सेनेतर्फे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतुल कांबळे तर बसपादेखील पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीला यंदा शिवसेनेची साथ

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या सतीश चव्हाणांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची राष्ट्रवादीच्या गाेटात चर्चा असली तरी या पक्षातील इतर नेतेही एेनवेळी ‘चमत्कार’ घडवून उमेदवारी पदरात पडण्याची वाट पाहून आहेत. दरवेळी शिवसेनाही या निवडणुकीत उमेदवार देत असते, मात्र त्यांना आतापर्यंत यश मिळाले नाही.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शिवसेनेचे चांगले नेटवर्क आहे. २००८ च्या निवडणूकीत शिवसेनेने भाजपचे श्रीकांत जाेशी यांच्याविरोधात राजू वैद्य यांना मैदानात उतरवले होते. त्या वेळी वैद्य यांनी १५ हजारपेक्षा अधिक मतदान घेतले होते. वैद्य यांची उमेदवारीच जाेशींच्या पराभवास कारणीभूत ठरल्याची तेव्हा चर्चा हाेती. यंदा मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी राहू शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser