आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र व राज्य सरकारने विद्युत खासगीकरणाला सुरुवात केली आहे. या विरोधात सर्व तीस वीज संघटना एकत्रित झाल्या आहेत. 2 जानेवारी रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
महावितरणचे सीएमडी व राज्य ऊर्जा सचिव यांनी बोलावलेल्या बैठकीला शिष्टमंडळ जाणार आहे. बैठकीत तोडगा निघाला नाहीतर 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 72 तासांसाठी संप पुकारला जाईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी तथा महामंत्री अरूण पिवळ, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन , प्रादेशिक सचिव अविनाश चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आशिया खंडात व देशात अतिशय चांगले काम करत आहे. सरकार व प्रशासनाच्या चुकीच्या धोराणामुळे थकबाकीचा डोंगर वाढला आहे. याला कामगार, अधिकारी व अभियंते दोषी नाहीत. तरीही याचे खापर आमच्यावर फोडून वीज खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. हे अत्यंत चुकीचे व वीज कामगार, अधिकारी, ग्राहकांसाठी अतिशय माकर ठरेल व सुस्थित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांचे उद्या खासगीकरणामुळे दिवाळे निघेल. तेव्हा हातची वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे आताच हा डाव थांबवणे व भविष्यातील भीषण संकट रोखण्यासाठी आम्ही सर्व तीस संघटना एकत्रित येऊन संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात लोकशाही मार्गाने खासगीकरणाला कडाडून विरोध करत आहोत.
18 डिसेंबरपासून असहकार आंदोलन सुरू आहे. 23 डिसेंबर रोजी अधिवेशनावर 30 हजार वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांनी विशाल मोर्चा काढला होता. पण या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्रीच हजर नव्हते. उद्याचा मोर्चा लक्षवेधी व सूचक असेल. त्यानंतर आमची सीएमडी, ऊर्जा सचिव यांच्या सोबत बैठक होईल. खासगीकरण त्यांनी रद्द करण्याचे मान्य केले नाहीतर 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 1 लाखांवर वीज कामगार, कर्मचारी, अभियंते व अधिकारी संपावर जातील. ग्राहकांना त्रास देणे आमचा उद्देश नसून त्यांच्या आमच्या सर्वांच्या हितासाठी व भविष्याचा वेध घेऊन आंदोलन करतोय.
सरकारला वेळीच जाग आली नाहीतर पुढे ग्राहक, सामाजिक संघटनांच्या मदतीने देशव्यापी आंदोलन, बेमुदत संप सुरु केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा जहिरोद्दिन, चव्हाण, पिवळ यांनी दिला. यावेळी राजेंद्र राठोड, वाल्मिक निकम, विनय घनबहादूर, हबीब पटेल, अभय पंडित, नवनाथ पवार आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.