आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे बंद:देवळाई परिसरातील रेणुकामाता कमान ते होळकर चौकापर्यंत अंधाराचे साम्राज्य

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाई परिसरातील रेणुकामाता कमान ते चाटे स्कूल होळकर चौकापर्यंत काही ठिकाणी पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणी दिवेच नसल्याने या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे संध्याकाळी शतपावली करणाऱ्या नागरिकांना तसेच घरी जाणाऱ्या महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पथदिवे बसवण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

देवळाई परिसरात काही भागांत विकास कामे सुरू आहेत, तर काही भागांत समस्यांचे डोंगर आहेत. रेणुकामाता कमानीपासून होळकर चौकापर्यंत पथदिवेही बसवण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी पथदिवे असले तरी ते बंद आहेत. अंधारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वारंवार निवेदने देऊन, तक्रारी करूनही समस्या सुटत नाहीत. या वसाहतीमधील वीस हजारपेक्षा जास्त नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. रात्रीच्या वेळी महिलांना घरी परतणेही कठीण झाले आहे. टवाळखोर छेडछाड करतात, अशा तक्रारीही या परिसरातील महिला करत आहेत. त्यामुळे पथदिवे बसवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

रात्री होतात लहान-मोठे अपघात पथदिवे नसल्याने रात्री लहान-मोठे अपघात नेहमीचेच झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पथदिवे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. - संतोषसिंग दारोगा, नागरिक

रस्त्यावर लूटमारीच्या घटना घडतात उमरीकर लॉन्स ते फाइव्ह लोटसपर्यंत पथदिवे नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर लूटमारीच्या लहान-मोठ्या घटना घडतात. महिलांना व रहिवाशांना या रस्त्यावरून रात्री येणे-जाणे कठीण झाले आहे. - विष्णू तुपे, रहिवासी

तक्रारी करूनही समस्या सुटत नाही रात्री महिलांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. याविषयी आम्ही वारंवार तक्रारी करत आहोत. परंतु प्रशासन त्या गांभीर्याने घेत नाही. - असद पटेल, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...