आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाकडे दुर्लक्ष:अतिक्रमणे, रस्त्यांची कामे, बेशिस्त पार्किंग; पथविक्रेत्यांमुळे शहरात एंट्री पॉइंटची कोंडी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सध्या लग्नाचा मोसम आहे. शिवाय नाताळाच्या सुट्यांचे वेध लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तसेच अतिक्रमणे, रस्त्यांची कामे, बेशिस्त पार्किंग, पथविक्रेत्यांमुळे शहराच्या सगळ्या एंट्री पाॅइंटची कोंडी झाली आहे. हर्सूल, बीड बायपास, पडेगाव, नगर नाका, मुकुंदवाडी, झाल्टा फाटा या सगळ्या शहराच्या एंट्री पॉइंटवरून निघण्यासाठी २० मिनिटे लागतात. पोलिस, मनपाने यासाठी कुठलेच नियोजन केले नाही. नगर नाक्याजवळ रेल्वे ब्रिजचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे.

एकाच बाजूचा मार्ग सुरू असल्यामुळे १०० मीटरचे हे अंतर पार करण्यासाठी बराच वेळ लागतो. नगर नाक्याला रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहतूक रेल्वेस्टेशनमार्गे महानुभव आश्रम आणि लिंक रोडला जोडली आहे. त्यामुळे या रस्त्यावरही वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे या तेथूनही शहरात येताना बराच वेळ लागतो. केंब्रिज चौक, झाल्टा फाट्यावरून येणारी वाहने शहरात येतात. या रस्त्यावर अनेक मंगल कार्यालये आहेत. त्यांची पार्किंग बेशिस्त आहे. पथविक्रेते, दुकानांसमोरील पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता ओलांडण्यासाठी बरीच कसरत करावी लागते.

पार्किंग, हॉकर पॉलिसी दोन वर्षांपासून ठरेना
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पार्किंग आणि हॉकर पॉलिसी अमलात येणे गरजेचे आहे. दोन वर्षांपासून यावर काम सुरू आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनपासोबत पोलिस, आरटीओ यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. - अभिजित चौधरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक

वाहतुकीला अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई
शहरात जेथे विकास कामे सुरू आहेत तेथे पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. मंगल कार्यालय, हॉस्पिटल, हॉटेल, कोचिंग क्लास, दुकानांना पार्किंगबाबत सूचना देण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. - दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.

बातम्या आणखी आहेत...