आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सभागृहाचे 6.5 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी 1.25 लाखाची लाच मागणारा अभियंता अटकेत

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वरिष्ठांपर्यंत टक्केवारी द्यावी लागते म्हणत सुटीच्या दिवशी आला पैसे घ्यायला

सामाजिक सभागृहाचे चार वर्षांपासून रखडलेले साडेसहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता संजय राजाराम पाटील (५२, रा. गुरू गणेश अपार्टमेंट, उल्कानगरी) याच्या एसीबीने मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, शनिवारी सुटी असूनही पाटील दुपारी तीन वाजेच्या सुमारास लाचेच्या सव्वा लाखातील पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये घ्यायला आला अन् खिशात पैसे टाकताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

वाय. पी. डेव्हलपर्स यांना चार वर्षांपूर्वी मुकुंदनगर येथील मारुती मंदिराच्या सभागृहाचे आमदार निधीतून बांधकाम करण्याचे टेंडर मिळालेहोते. डेव्हलपरने ५८ वर्षीय तक्रारदाराकडे बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी दिलीहोती. त्यानुसार कंत्राटदाराने सभागृहाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पूर्ण केले. परंतु, निधीअभावी काही काम अपूर्णहोते. त्यानंतर लॉकडाऊन लागले व संपूर्ण काम प्रलंबित राहिले. तीन महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पाटील याची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यानंतर पाटील सभागृहाची पाहणी करण्यासाठी गेला. मात्र, कामात त्रुटी काढून त्याने बदल सांगितला व ५० हजारांचे अधिकचे काम करण्याच्या सूचना केल्या. कंत्राटदाराने तेही पूर्ण केले. नंतर निधीची मागणी केली. मात्र, सा.बां. विभागाने त्यांना केलेल्या खर्चापेक्षा कमी बिल काढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पाटीलने जुन्या कामाचे नव्या दराने बिल काढण्याचे आश्वासन देत चार लाखांचे बिल जवळपास सहा लाखांपर्यंत नेऊन ते मंजूर करण्यासाठी पैसे मागितले.

पैसे दिले तरच बिल मंजूर करू
पाटीलने तक्रारदाराला सव्वा लाख रुपये मागितले. त्याशिवाय निधी मंजूर होणार नाही, असे सांगितले. तक्रारदाराने ११ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे ठरवले. अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे त्यांनी तक्रार केली. उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांना खाडे यांनी शहानिशा करण्याच्या सूचना केल्या. पाटील वारंवार तक्रारदाराला वरिष्ठांपर्यंत टक्केवारी द्यावी लागते, असे सांगतहोता. शुक्रवारी पथकाने शहानिशा केली असता पाटीलने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचला.

बांधकाम विभागाची लाचखोरी :
उल्कानगरीतील घराजवळ बोलावले शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुटी होती. त्यामुळे पाटीलने तक्रारदाराला उल्कानगरीतील घराजवळ पैसे घेऊन बोलावले. त्याने आधी पूर्ण पैसे मागितले. त्यावर तक्रारदारने एवढे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर ५० हजार मागितले. त्याच वेळी एसीबीचे अधिकारी, कर्मचारी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दबा धरून उभे होते. दुपारी तीन वाजता पाटीलने तक्रारदाराकडून रोख ४० हजार स्वीकारताच पथकाने धाव घेत त्याला पकडले. अंमलदार दिगंबर पाठक, शिरीष वाघ, अशोक नागरगोजे, चंद्रकांत बागूल यांचा पथकात सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...