आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्याही कौशल्यास तंत्रज्ञानाची जोड दिली तर नवनिर्मिती होते. तरुणांनी आपल्या कल्पकतेचे व्यावहारिक उपयोजन करून उद्यमशीलतेची त्याला जोड दिली पाहिजे, असा सल्ला ‘मॅनेजमेंट गुरू’ तथा एंड्युरन्स कंपनीचे प्रकल्प प्रमुख राजेंद्रकुमार पवार यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ’आविष्कार’ महोत्सवाचे मंगळवारी (३ जानेवारी) त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.
पवार म्हणाले, ‘ ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, नवोन्मेष या पंचसूत्रीचा जीवनात अमल करा. माणसाच्या अंगात काही जन्मजात कौशल्ये असतात. ती विकसित करता येतात. सध्याचा काळ मार्केटिंगचा आहे. आपल्या कला, कौशल्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे.’ असेही त्यांनी म्हटले. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ’कृत्रिम बुद्धिमत्ते’सह अनेक नवीन विषय संशोधनासाठी उपलब्ध झाले आहेत. बुद्धीला चालना देणारे बदल आपण स्वीकारले पाहिजेत.
कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यंदाच्या महोत्सवात सहा ज्ञानशाखांतील संशोधक सहभागी झाले आहेत. प्रा.पराग हासे व प्रा.सुचेता एम्बल यांनी सूत्रसंचालन केले. बुधवारी दुपारी ४ वाजता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
‘अॅपल’ क्रांती संशोधकांनी लक्षात ठेवावी : कुलगुरू डॉ. येवले जगाच्या इतिहासात तीन सफरचंदांनी क्रांती केली आहे. ‘अॅडम-ईव्ह’यांनी सफरचंद खाल्ले आणि मानवी सृष्टी जन्माला आली. दुसरी न्यूटनने झाडावरून सफरचंद पडताना पाहिले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तिसरी स्टीव्ह जॉब्ज याने “अॅपल’ शोधून मोबाइलची क्रांती घडवली. संशोधकांनी या तीन अॅपलची उदाहरणे कायम लक्षात ठेवली पाहिजेत, अशी अपेक्षाही कुलगुरूंनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.