आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:कोविड नमुने तपासणीसाठी यंत्र सामुग्री उपलब्ध, दहा दिवसांत प्रयोगशाळा कार्यान्वीत होणार; खासदार ॲड. सातव यांचा पाठपुरावा

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे कोविड नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी खासदार ॲड. राजीव सातव यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शुक्रवारी (ता. १८) या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्र सामग्री उपलब्ध झाली आहे. पुढील दहा दिवसांत प्रयोगशाळा सुरु होणार असल्याने रुग्णांचे अवघ्या चार तासात कोविड अहवाल मिळणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोवीड रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्याच्या ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र कोविड रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागत होते. त्याचा अहवाल येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने सामाजिक संक्रमण अधिक गतीने वाढण्याची भिती होती.

दरम्यान, हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात स्वॅब नमुने तपासणीसाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळा उभारणीची मागणी खासदार ॲड. राजीव सातव यांनी केली होती. त्यानंतर शासनाने प्रयोगशाळेला मान्यताही दिली. जिल्हाधिकारी रचेश जयवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेच्या कामाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी यासाठी लागणारी आरटीपीसीआर मशीन, आरएनए एक्सॅक्टर मशीन, लॅमीनॉर फ्लो कॅबीनेट, बायोसेफ्टीक कॅबीनेट, पीसीआर कॅबीनेट आदींसह लहान मोठ्या यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. या सोबतच मायनस २२८ डिग्री, ८० व २० डिग्री तापमानाचे फ्रिज उपलब्ध झाले आहे. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेतून ७५ लाख रुपये तर इतर यंत्र सामग्री खरेदीसाठी जिल्हा नियोजन समिती व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून २ कोटी १२ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास शासनाने शुक्रवारी ता. १८ मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढील दहा दिवसांत प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे.

एका दिवसांत २०० नमुन्यांची होणार तपासणी

या ठिकाणी प्रयोगशाळेसाठी आलेल्या यंत्रामधून ४ तासात ९६ नमुने तपासणी करून अहवाल देण्याची क्षमता आहे. त्यामुळे एका दिवसांत सुमारे २०० नमुने तपासले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांचे स्वॅब नमुने घेतल्यानंतर चार तासात अहवाल मिळणार असल्याने तातडीने औषधोपचार करणे शक्य होणार आहे.

२० जणांचे मनुष्यबळ लागणार

या प्रयोगशाळेसाठी किमान २० जणांचे मनुष्यबळ लागणार आहे. यामध्ये २ वैद्यकिय अधिकारी, २ पॅथॉलॉजीस्ट, १० लॅब टेक्नीशीयन, २ डाटा एन्ट्री ऑपरेटर, चार सफाईकामगार आदी मनुष्यबळाचा समावेश आहे. या मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी लागणारा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानातून केला जाणार आहे.