आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद विकासाचा:औरंगाबादच्या विकासासाठी ‘को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन’ स्थापन करा : आदित्य ठाकरे

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रांती चौक सायकल ट्रॅकचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी सायकल चालवण्याचा आनंद घेतला. - Divya Marathi
क्रांती चौक सायकल ट्रॅकचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी सायकल चालवण्याचा आनंद घेतला.
  • जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा येईन

औरंगाबाद शहराच्या विकासात स्थानिक नागरिकांचे योगदान आवश्यक आहे. विकासकामांत त्यांच्या सूचना-सहभाग असावा, यासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन स्थापन करण्याची सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला उद्देशून केली. हॉटेल रामा येथे शनिवारी आयोजित ‘संवाद विकासाचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला त्यांनी विविध क्षेत्रांतील ८ मान्यवरांची मते जाणून घेतली आणि नंतर आपली भूमिका मांडली.

औरंगाबादच्या सर्वांगीण विकासासाठी काय केले पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी आदित्य यांनीच पुढाकार घेऊन ‘संवाद विकासाचा’ ही संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेतून त्यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील मंडळींकडून भविष्यातील औरंगाबादविषयी अपेक्षा जाणून घेतल्या. आदित्य म्हणाले, ‘संवाद विकासाचा या संकल्पनेची सुरुवात औरंगाबादेतून होत आहे. शहराला पॅकेजचा बूस्टर डोस देण्यासाठी एक मास्टर प्लॅन असावा. त्यात शहराच्या विकासाचे टप्पे असतील. हे सर्व करण्यासाठी व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक अनौपचारिक गट असावा. हा गट शासन व विकासप्रकल्प यातील दुवा म्हणून काम करेल. गटात शहरातील सुज्ञ व तज्ज्ञ नागरिक असावेत. या गटाला को-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असे नाव द्यावे. आपण करत असलेल्या कामाचे मॉनिटरिंग आणि रिव्ह्यू करण्याचे काम हा गट करेल. या गटाच्या माध्यमातून सतत संवाद, भेटी होत राहतील. किमान दोन महिन्यांतून एकदा तरी आपण असेच एकत्र येत राहू आणि विकासाची दिशा निश्चित करू.’

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा येईन
शनिवारी जशी बैठक झाली, अशीच बैठक पुन्हा घेऊ. मी या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा येईन. मला शहराच्या कुठल्या भागात घेऊन फिरायचे, हे तुम्हीच ठरवा, मी यायला तयार आहे, असेही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आता तुम्हीही बोला...!
नागरिकांनो, भविष्यातील
औरंगाबादविषयी तुमचीही मते मांडा.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भविष्यातील औरंगाबादबाबत वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांची मते जाणून घेतली. शहरातील अनेक नागरिकांच्याही काही अपेक्षा आहेत. या अपेक्षा आणि संकल्पना समजून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादवर मनापासून प्रेम करणाऱ्या नागरिकांनी भविष्यातील औरंगाबाद कसे असावे, शहराच्या विकासासाठी काय करावे, हे सांगावे.
या तुमच्या कल्पना, सूचना ९९२२८९३३५८
व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवा.
आपण प्रयत्न करू, नवे शहर घडवण्याचा!

बातम्या आणखी आहेत...