आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 महाविद्यालयांच्या चौकशीला सुरूवात:पाच समित्यांची स्थापना; पुढील आठवड्यात अहवाल सादर करून होणार सुनावणी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आता दुसऱ्या टप्यातील 12 महाविद्यालयांच्या चौकशीला सुरूवात केली आहे. त्यासाठी प्र-कुलगुरूंसह चार अधिष्ठातांच्या स्वतंत्र पाच समित्यांचे गठण केले आहे. पाचही समित्यांनी बारा महाविद्यालयांना भेटी देण्यास गुरूवारपासून (28 जुलै) सुरूवात केली. कमाल नव्हे तर किमान निकषांचे पालन देखील महाविद्यालयांनी केले नसल्याची बाब पुढे येत आहे.

70 महाविद्यालयांची यादी तयार

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी परीक्षा काळात खुलताबाद येथील कोहिनुर कॉलेजला अचानक भेट दिली होती. त्यावेळी त्यांना कॉलेजला मासकॉपीचा प्रकार दिसून आला. पायाभूत सुविधांचीही वानवा असल्याचे त्यांनी पाहिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट यांच्या अध्यक्षतेत पडताळणीसाठी समिती गठित केली. अहवाल आल्यानंतर कुलगुरूंनी गंभीर कारवाई केली होती. तेव्हापासून कुलगुरू अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 2022-23 पासून शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास 70 महाविद्यालयांची त्यांनी यादीच तयार केली आहे.

12 महाविद्यालयाची पडताळणी सुरू

दुसऱ्या टप्यातील 12 कॉलेजच्या पडताळणीला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये जालाननगर येथील हुडा कॉलेज ऑफ एज्युकेशन, शरणापुर येथील डी.एस.आर कॉलेजची पडताळणी डॉ. चेतना सोनकांबळे यांची समिती करत आहे. तर जालनाच्या दाभाडी येथील राजुरेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाघ्रुळ जहांगिर येथील राजकुंवर महाविद्यालयाची पडताळणी डॉ. वाल्मीक सरवदे यांची समिती करत आहे.

पायाभूत सुविधांची होणार पाहणी

शेंद्रा येथील पीपल्स एज्युकेशन अँड सेक्युरिटीचे फॉरेन्सिक कॉलेज, उमरगा येथील आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल आणि बीड येथील आदित्य कॉलेजची पडताळणी डॉ.बी.बी. वायकर यांची समिती पायाभूत सुविधांची पाहणी करणार आहे. पैठणचे मॅजिक कंप्युटर अॅकॅडमी, हातनूरचे राष्ट्रीय कला महाविद्यालय आणि बीडचे मिलिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्ञ महाविद्यालयाची पडताळणी डॉ. प्रशांत अमृतकर करणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट यांच्याकडे कळंब येथील ज्ञानदेव मोहेकर कॉलेज, माधवराव पाटील कॉलेज मुरूम, सिडकोतील राधाई व विद्याधन कॉलेज या कॉलेजची पडताळणी आहे.

पुढील आठवड्यात सादर होणार अहवाल

बारा महाविद्यालयांची पडताळणी करून पुढील आठवड्यात पाचही समित्यांचे अध्यक्ष कुलगुरूंना अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. कुलगुरूंकडे अहवाल आल्यानंतर संस्थाचालाकांना बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. अंतिम सुनावणीत त्यांची बाजू कुलगुरू डॉ. येवले ऐकूण घेतील. त्यानंतर विद्यापीठ कायद्यातील 12 (14) (च) नुसार त्यांना प्राप्त अधिकारान्वये प्रवेश बंदी आणि दंड करण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...