आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात व्हायरलची साथ सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एच१ एन१ संसर्गाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब रुग्ण मनपाच्या आराेग्य केंद्रात उपचारासाठी माेठ्या संख्येने दाखल हाेत आहेत. मात्र, या आराेग्य केंद्रात अतिशय विदारक परिस्थिती दिसून आली. साेमवारी (१० एप्रिल) दिव्य मराठी प्रतिनिधीने मनपाच्या पाच मोठ्या आरोग्य केंद्रांची पाहणी केली. तेव्हा ओपीडीची वेळ सुरू होऊन तासभर होऊनही डाॅक्टर आले नव्हते. त्यामुळे रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागले. अनेक ठिकाणी गर्भवती महिला उन्हात उभ्या होत्या. औषध, गोळ्यांचाही तुटवडा दिसून आला.
शहरात मनपाचे ४० आरोग्य केंद्रे आहेत. यातील अनेक केंद्रांवर डाॅक्टर वेळेत येत नाहीत. रुग्ण सकाळपासून डाॅक्टरांची वाट पाहत उभे असतात. बहुतांश केंद्रांवर हीच परिस्थिती असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
जवाहरनगर आरोग्य केंद्र : (दुपारी १.०१ वाजता) जवाहरनगर आरोग्य केंद्रात सकाळी १० वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत ६० रुग्णांनी ओपीडीत तपासणी करण्यात आली. १ वाजता येथे वैद्यकीय अधिकारी नव्हते. येथे केवळ दोन रुग्ण होते. ते नर्सकडून तपासणी करून घेत होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय नवगिरे यांच्याबाबत चाैकशी केली असता ते शेजारील शाळेत भेट देण्यासाठी गेले. आतापर्यंत इथेच होते, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुपारचा १ वाजला म्हणून काही कर्मचारी घरी निघण्याच्या तयारीत हाेते.
विजयनगर आरोग्य केंद्र (वेळ : दु. १२.५२ वा.) सकाळी १० वाजेपासून ओपीडीत रुग्ण आले होते. आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे रुग्णांना बसण्यासाठी जागा नव्हती. सर्वजण उन्हात उभे होते. त्यात गर्भवती महिलादेखील होत्या. डॉक्टर कधी येणार असे कर्मचाऱ्यांना विचारले असता ते शेजारील राजनगर केंद्रावर गेल्याचे सांगण्यात आले. शिवाय या आरोग्य केंद्रात गोळ्यांचा तुटवडा असल्याचे रुग्णांनी सांगितले. डॉ. अश्विनी कुलकर्णी या केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आहेत.
शिवाजीनगर आरोग्य केंद्र : (स. १०.३० वा.) शिवाजीनगरातील आरोग्य केंद्रात सकाळी १०.३० वाजता डॉ. स्मिता नळगीरकरांसह चार नर्स उपस्थित होत्या. ओपीडीत गर्दी होती. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक होते. रुग्णांची कोविड टेस्ट सुरू हाेती. कोविड लस संदर्भात नागरिकांकडून विचारपूस केली जाते हाेती. पण लस नसल्याने अनेकांना परत जावे लागल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.