आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोना गेल्यावरही 15% लोकांना 'चिंता विकृती'चा आजार, तरुणांना करिअरच्या, तर गृहिणींना कुटुंबाच्या चिंतेने ग्रासले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा सैल झाला असला तरी गेल्या दोन वर्षांतील वाईट अनुभवांमुळे १० ते १५% नागरिकांना "चिंता विकृती'ने ग्रासले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी किमान १८ महिन्यांचा कालावधी लागू शकताे. आजारी नसतानाही तसे विचार येण्याला ‘चिंता विकृती’ म्हटले जाते.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य हरवले. अशांसाठी दै. दिव्य मराठी, सरकार व स्टेट सायकियाट्रिस्ट असोसिएशन तसेच अक्षरमानवतर्फे राज्यस्तरीय, तर औरंगाबाद मनपातर्फे हेल्पलाइन सुरू केल्या होत्या. यात "स्पा'चे अध्यक्ष व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.संदीप सिसोदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा.डाॅ.अपर्णा अष्टपुत्रे आणि त्यांची टीम समुपदेशन करतात. या टीमला दोन वर्षांत सरासरी २.५ ते २.८ लाख कॉल आले.

अजून दीड वर्षापर्यंत जाणवतील परिणाम
कोरोनाचा अनुभव घेतलेल्यांना त्या काळातील परिस्थितीची अजूनही भीती वाटतेय. कोरोना बरा झाला तरी आपले हृदय कमजोर झाले, धाप लागतेय, गुडघेदुखी, डोकेदुखी होत असल्याचे त्यांना विनाकारणच वाटतेय. हे मनाने ठरवलेले दुखणे आहे. ते किमान दीड वर्ष टिकेल. -डॉ.संदीप सिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक

विद्यार्थी : स्पर्धेची चिंता
कोरोनामुळे गतवर्षी दहावी-बारावीचे विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण झाले. मात्र, यंदा अर्धे वर्ष ऑनलाइन तर उर्वरित ऑफलाइनमध्ये गेले. मनाजोगा अभ्यास झालेला नाही. पाया पक्का नसल्याने स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जायचे? आदी चिंता विद्यार्थ्यांना आहेत.

नोकरदार : अल्पसंतुष्ट
नोकरीतील अस्थैर्यामुळे नोकरदार वर्ग अल्पसमाधानी झाला. तो मोठी उडी घेण्याचे धाडस टाळतो आहे. आपल्याला काही झाले तर कुटुंबाचे काय होईल, या विचाराने आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता संपली आहे. कमालीची ‘अॅडजस्टमेेंट’ आली आहे.

गृहिणी : अस्वस्थता
कमी पैशात घर चालवण्याची जबाबदारी आल्यामुळे महिलावर्ग नवीन खरेदी, नटणे, छंद जरा बेतानेच करत आहे. पतीची नोकरी, मुलांचे करिअर याची चिंता सतावत आहे. महिलांची धावपळ होतेय. चिडचिड हाेत आहे. नवीन आजार जडत आहेत.

ज्येष्ठ : घरात कोंडले
संसर्गाचा धोका जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिक अजूनही घराबाहेर जाण्यास धजावत नाहीत. हा वर्ग सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. कोरोना विषयक बातम्या त्यांना अस्वस्थ करायच्या. यामुळे टीव्ही पाहणे सोडले. असे संकट आल्यास तयारी असावी, यासाठी पैसा जपून ठेवत आहेत.

किमान १६ महिने चिंता : द लॅन्सेट पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार, कोरोनाचा सर्वांवरच समान मानसिक परिणाम झालेला नाही. जे कधीच संक्रमित नाही झाले त्यांची कोरोनाविषयक चिंता व ताणतणाव दोन महिन्यांत संपले. ७ दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्णालयात राहिलेल्यांना १६ ते १८ महिन्यांपर्यंत चिंता व तणाव जाणवतील.

दहापट रुग्ण वाढले : कोरोनापूर्वी डॉ.सिसोदे यांच्या क्लिनिकमध्ये दर रोज सरासरी २० ते २२ रुग्ण समुपदेशनासाठी यायचे. पैकी २-३ रुग्ण चिंता, नैराश्य व भविष्य आदीशी संबंधित असायचे. कोरोनाकाळात १०-१२ रुग्ण यायचे. कोरोनानंतर रुग्णसंख्या वाढली. आता १२ ते १५% रुग्ण नैराश्य व भविष्याबाबत चिंता असणारेच येतात.

बातम्या आणखी आहेत...