आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० परिषदेसाठी पाहुणे येणार म्हणून टाऊन हॉल ते मकई गेटपर्यंतचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता तयार करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मार्च उजाडला तरीही या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे दहापेक्षा जास्त वसाहतींमधील रहिवासी, बीबी का मकबराकडे जाणारे पर्यटक, विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक अशा एकूण एक लाख लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टाऊन हॉल ते मकई गेटपर्यंतचा रस्ता न झाल्याने विद्यापीठाकडे दररोज जाणारे विद्यार्थी, प्राध्यापक यांच्यावर आता पाणचक्कीमार्गे ये-जा करण्याची वेळ आली आहे, तर जयभीमनगर आसेफिया कॉलनी ते मकई गेटपर्यंतच्या रहिवाशांना पायी चालणेही कठीण झाले आहे.
जी-२० चे पथक मकबरा पाहण्यासाठी जाणार असल्याने टाऊन हॉल ते मकई गेटपर्यंत काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार होता. १५ जानेवारीपासून तो रस्ता खोदण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, परंतु तीन महिने उलटले तरी रस्ता तयार झाला नाही. उलट रस्त्याच्या बाजूला असलेले ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहते. पायी चालणेही कठीण झाले आहे. कोणी आजारी पडले तर त्याला न्यायचे कसे, असा प्रश्न पडतो. विद्यार्थ्यांना त्याच घाण पाण्यातून व खोदून ठेवलेल्या रस्त्यातून वाट काढावी लागते. प्रशासन मात्र लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नवीन लाइन टाकल्याने कामास झाला उशीर काँक्रीटचा रस्ता तयार केल्यानंतर ड्रेनेज व पाण्याची पाइपलाइन टाकता आली नसती. नवीन पाइपलाइन टाकल्याने कामात विलंब झाला. कामाला गती देण्यात येईल. लवकरच रस्ता पूर्ण होईल. - इम्रान खान, प्रोजेक्ट मॅनेजर, स्मार्ट सिटी
आर्थिक, मानसिक त्रास पूर्वी पहाडसिंगपुऱ्यात जाण्यासाठी पाच ते सहा मिनिटे लागत होती. आता मिल कॉर्नरमार्गे वळसा घेऊन जावे लागते. त्यामुळे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. आर्थिक भुर्दंडासोबतच मानसिक त्रासही वाढला आहे. - राधाकिसन पंडित, रहिवासी, पहाडसिंगपुरा
आंदोलनाच्या तयारीत विद्यापीठ, घाटी, बीबी का मकबरासह आसपासच्या वसाहतीत ये-जा करण्यासाठी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. आता आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहोत. - इक्बालसिंग गिल, माजी सभापती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.