आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजभवन कार्यालयाने ५५ ते ६० लाख रुपये देऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवातील खेळाडूंची निवास व्यवस्था केली नव्हती. २ डिसेंबरपासूनच विद्यापीठात संघ येण्यास सुरुवात झाली, पण विद्यापीठाने खेळाडूंवर रात्रभर थंडीत कुडकुडत बसण्याची वेळ आणली. चिडलेल्या खेळाडूंनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संपर्क साधला. मंत्र्यांनीही कुलगुरूंना रात्री २ वाजता फोन करून व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर २१२० खेळाडूंसाठी फक्त ७५० गाद्या दिल्या.
विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवासाठी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा कबड्डी संघ शुक्रवारी दुपारी विद्यापीठात आला. इतर संघही आले होते. मात्र, त्यांना रात्री खोल्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. ज्यांना हाॅल उपलब्ध करून दिले त्यांना गाद्या दिल्या नाहीत. पत्र्याचे शेड असलेल्या वसतिगृहात काहींना पाठवले. तेथे भंगार पडलेले होते. स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती. त्यांच्या संघ व्यवस्थापकांनी इतर ठिकाणी व्यवस्था करण्यास सांगितले. पण निवास व्यवस्था समितीतील प्रत्येक सदस्य एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. प्रवास करून थकलेले काही खेळाडू मैदानातील पेंडॉल, हाेस्टेलच्या व्हरंड्यात, बॅडमिंटन हॉलसमोर झोपले.
काही खेळाडूंनी वनमंत्री मुनगंटीवार यांना फोन केला. मंत्र्यांनी गोंडवानाच्या कुलगुरूंना यात लक्ष घालण्यास सांगितले. गोंडवानाच्या कुलगुरूंनी डाॅ. प्रमोद येवले यांना रात्री फोन करून मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून खेळाडूंची तातडीने व्यवस्था करण्यास सांगितले तरीही पहाटेपर्यंत काहीच व्यवस्था होऊ शकली नव्हती. महिला संघालाही खराब, फाटक्या गाद्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी पत्रकारांनी संपर्क केला असता त्यांनी माहिती घेतो, त्यात तथ्य आढळले तर चौकशी करू, असे म्हटले.
मंत्र्यांचा फोन आला होता एकाच विद्यापीठाला त्रास झाला. मंत्रिमहोदयांच्या पीएचा मला फोन आला होता. गोंडवाना संघाला खोली दिली होती. त्यांना आवडली नाही. ती दुसऱ्या टीमने घेतली. त्यामुळे त्यांची पुन्हा व्यवस्था करण्यासाठी थोडा वेळ लागला. - डॉ. दयानंद कांबळे, क्रीडा संचालक, विद्यापीठ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.