आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यास देणाऱ्या शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कॉलेजचे परीक्षा केंद्र अखेर रद्द केले आहे. त्याचबरोबर डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेतील तीन सदस्यीय समितीने (५ एप्रिल) बुधवारी साडेसहा तास कॉलेजची कसून चौकशी केली. चौकशी सुरू असतानाच कुलुगरू डॉ. प्रमोद येवले यांनी दुपारी परीक्षा केंद्र रद्द केले. समिती गुरुवारी (६ एप्रिल) सायंकाळी कुलगुरूंना अहवाल सादर करणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास काॅलेजला संलग्नता रद्दची नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
श्रेयांक पद्धतीनुसार पदवी परीक्षेला २८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘मासकॉपी’ तर सुरूच होती. त्याशिवाय पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पाचशे रुपये घेऊन सायंकाळी ४ ते ६ यादरम्यान पुन्हा पेपर लिहिण्यास देण्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’ने चव्हाट्यावर आणला. कुलगुरूंनी ‘दिव्य मराठी’ एक्स्पोजची गंभीर दखल घेऊन तीनसदस्यीय समिती स्थापन केली. डॉ. वायकर यांच्यासह प्राणिशास्त्राचे प्रा. डॉ. राम चव्हाण, भौतिकशास्त्राचे डॉ. बी. एन. डोळे यांचा समितीत समावेश आहे. परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी कोळवाडी येथील गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द केले होते.
या कॉलेजचे प्रकरणही ‘दिव्य मराठी’नेच उघडकीस आणले होते. मॅनेजमेंट कॉलेजमध्ये होतील परीक्षा : कुलगुरूंनी फोनवरून माहिती घेऊनच येथील परीक्षा केंद्रही रद्दची घोषणा केली. यासंदर्भात जारी केलेल्या पत्रात शेंद्रा येथील ‘कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ येथे गुरुवारपासून (६ एप्रिल) यापुढील परीक्षा घेतली जाणार आहे. बीएस्सी संगणकशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स, आयटी, बीएस्सी, बीबीए या पाचही अभ्यासक्रमांची परीक्षा नव्या केंद्रावर होईल. बदललेल्या परीक्षा केंद्रावर २०१ विद्यार्थी परीक्षा देतील. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी केले आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे नोंदवले जबाब दळवी कॉलेजमध्ये बुधवारी बैठ्या पथकाच्या निगराणीत परीक्षा घेण्यात आली. डॉ. वायकर समितीच्या निरीक्षणानुसार कॉलेजमध्ये प्रचंड अनियमितता आढळून आली आहे. मान्यताप्राप्त अध्यापकांची वाणवा दिसून आली. विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, तसेच झेरॉक्स सेंटर व अन्य घटकांकडून समितीने माहिती जाणून घेतली. सायंकाळापर्यंत चौकशी सुरूच होती. अहवाल गुरुवारी सादर केला जाईल. त्यानंतर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे.
‘काॅलेजची संलग्नता रद्द करा’ छत्रपती संभाजीनगर | विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील ‘मासकॉपी’सह विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’ने उघड केल्यानंतर अशा कॉलेजमुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संलग्नता रद्दची कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनांनी कुलगुरूंकडे केली आहे. त्यामध्ये एसएफआय, स्वाभिमानी मुप्टा, उत्कर्ष, बामुक्टो आणि मुप्टाचा समावेश आहे. अभाविपने प्रशासकीय इमारतीसमोर बुधवारी (५ एप्रिल) आंदोलनही केले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘दिव्य मराठी’ने परीक्षेतील ‘मासकॉपी’चे प्रकार समोर आणले आहेत. कोळवाडीतील जिवरख महाविद्यालयाने तर २२ किमी दूरवरील शाळेत परीक्षेचा घाट घातला होता. शेंद्रा येथील दळवी कॉलेजमध्येही परीक्षेचा बाजार मांडला होता. संबंधित संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करून संलग्नीकरण रद्द करावे.’उत्कर्षचे व्यवस्थापन परिषद सदस्य दत्तात्रय भांगे, अधिसभा सदस्य हरिदास सोमवंशी, मुप्टाचे सुनील मगरे, स्वाभिमानी मुप्टाचे डॉ. शंकर अंभोरे, एसएफआयचे सत्यजित मस्के, अशोक शेरकर, आरपीआय (ए)चे नागराज गायकवाड, एनएसयूआयच्या दीक्षा पवार, बामुक्टोचे डॉ. विक्रम खिलारे यांनी निवेदने दिली. अभाविपचे जिल्हा संयोजक उमाकांत पांचाळ, नगरमंत्री चिन्मय महाले, विद्यापीठ मंत्री रवी आदनाक यांनी निदर्शने केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.