आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारी त्रस्त:आठवडी बाजारात ठेकेदाराची जादा वसुली, छावणी परिषदेचे मात्र दुर्लक्ष

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छावणीतील गुरुवार आठवडी बाजारात ठेकेदार शेतकरी-विक्रेत्यांकडून मनमानी वसुली करत आहे. दरपत्रकाच्या फलकाचे बंधन पायदळी तुडवले जात आहे. व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. यासंदर्भात जनसंघर्ष लोकप्रतिष्ठानतर्फे छावणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली, तरीही कारवाई झाली नसल्याने विक्रेते व शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी हाेत आहे. छावणी बाजारात धान्य, कपडे, जनावरांची खरेदी-विक्री होते. ठेकेदाराने विक्रेत्यांकडून किती शुल्क घ्यावे आणि कोणकोणत्या अटी व नियमांचे पालन करावे हे छावणी परिषदेने करारात स्पष्ट केले आहे. तरीही दुप्पट, चौपट वसुली केली जाते. ३० ते ५० रुपयांएेवजी ७० ते १५० रुपये घेऊन त्याच्या पावत्याही िदल्या जात नाहीत. शुल्क वसुलीविषयी बाजारात विविध दर्शनी ठिकाणी स्पष्ट फलक असावेत, असे करारात नमूद केले आहे. त्याचे पालन होत नाही. शुल्क वसूल करणाऱ्यांना गणवेश नसतो. त्यांच्याकडे ओळखपत्र नसते. परिषदेच्या नियमावलीप्रमाणे बाजाराचा कारभार चालवावा, अशी मागणी मयंक पांडेय, सय्यद रशीद, पाशा खान, अतुल राठोड, ओमकार सिंग, रवी वर्मा, अरविंद शेलार, योगेश दुबे, मोहंमद फेरोज आदींनी केली होती. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आता ठरवून दिलेले शुल्क वसूल करा, पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या, शौचालयाची व्यवस्था करा आदी मागणी विक्रेते, शेतकरी करत आहेत. याविषयी छावणीचे सीइओ सोनवणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

नियम पाळा अन्यथा तीव्र आंदोलन करू छावणी परिषदेने किमान चाळीस प्रकारच्या विक्रेत्यांसाठी २० रुपये ते ५० रुपयांपर्यंत दर ठरवून दिला आहे. परंतु त्याचे पालन ठेकेदारांकडून होत नाही. शेतकरी व विक्रेत्याची आर्थिक लूट थांबवण्यासाठी आम्ही निवेदने दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. आता विक्रेते व शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा जनसंघर्ष लोकप्रतिष्ठानचे अध्यक्ष मयंक पाडेय यांनी दिला.

ठेकेदार पावती न देता जादा पैसे घेतात ^मोटारसायकलीसाठी पन्नास, तर बैठकीसाठी १५० रुपये घेतात. त्याची पावती दिली जात नाही. तसेच कोणत्याही प्रकारची सुविधा बाजारात नाही. -साईनाथ जाधव, पोत, गंठण विक्रेता

मनमानी वसुली करू नये ^पावती देत नाही. सत्तर ते शंभर रुपये घेतात. पूर्वीसारखा व्यवसाय राहिलेला नाही. त्यामुळे परिषदेने ठरवून दिलेली रक्कम घ्यावी. पावती द्यावी. -अब्दुल जब्बार, मसाले विक्रेता

...तरी अधिकचे पैसे घेतात ^आम्ही पैठणवरून मासे विक्रीसाठी घेऊन येतो. दुचाकीवर माल आणला म्हणून पन्नास रुपये तसेच बैठकीचे १५० रुपये वसूल केले जातात. ते बंद करून ठरवून दिलेली रक्कम घ्यावी. -संतोष पैठणकर, मासे विक्रेता

बातम्या आणखी आहेत...