आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजा जप्त:तेरा वर्षांनंतर उत्पादन शुल्कची कारवाई; वेरूळच्या शेतातून 82 किलो गांजा जप्त

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल तेरा वर्षांनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील गांजाच्या अवैध शेतीकडे मोर्चा वळवला आहे. वेरूळ परिसरातील दोन शेतकरी गांजाचे पीक घेऊन बारा हजार रुपये किलोने विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून धनसिंग गुंडिराम गुमलाडू (४५) व झनकसिंग गुंडिराम गुमलाडू (४२, दोघेही रा. तलाववाडी, वेरूळ) यांच्या शेतात बुधवारी छापा टाकून ८२ किलो गांजाचे पीक जप्त करत दोघांना अटक केली.

गेल्या काही दिवसांपासून दारू विक्री व पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाई केली. आता विभागाने इतर अमली पदार्थांकडे मोर्चा वळवला आहे. विभागाचे उपअधीक्षक प्रदीप पोटे यांना वेरूळ परिसरातील गांजाच्या शेतीविषयी माहिती मिळाली होती. उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांच्याशी चर्चा करून त्यांनी दुपारी सापळ्याचे नियोजन ठरवले. छापा मारला असता तलाववाडी शिवारात असलेल्या शेतात दोन्ही शेतकऱ्यांकडे गांजाचे पीक आढळले.

एकाच्या शेतात ५६, तर दुसऱ्याच्या शेतात ३८ झाडे हाेती. ती सर्व मुळासकट उपटून पथकाने जप्त केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. पोटे यांच्यासह निरीक्षक संजय जाधव, एस. बी. राेटे, ए. ई. तातळे, भरत दौड, गणेश नागवे, एस. एस. गुंजाळे, वाय. बी. गुंजाळ, आर. जे. मुरडरकर, अनिल जायभाये, जी. पी. शिंदे, टी. ए. जारवाल, ज्ञानेश्वर सांबारे, कृष्णा पाटील, एस. एस. कादरी, किसन सुंदर्डे यांनी कारवाई पार पाडली.

ऊस, वांग्यात सात फूट उंचीची झाडे
दोन्ही शेतकऱ्यांनी ऊस, वांगे, कपाशीच्या पिकामध्ये गांजाच्या झाडांचे पीक घेतले होते. मुळांच्या जाडीवरून हे पीक अंदाजे वर्षभराचे असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. काही झाडांचा पाला आधीच तोडून त्यांनी परिसरात विकला असावा. झाडांची उंची ७ फूट असून बाजारात ओला गांजा १२ हजार रुपये किलो दराने विकला जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी विभागाकडून अमली पदार्थांची शेवटची कारवाई २००८ मध्ये झाली होती. त्यानंतर थेट २०२२ मध्ये विभागाने अमली पदार्थांकडे लक्ष वळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...