आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या गोपनीय पत्रामध्ये महादेव इंगळे नावाच्या व्यक्तीने मागितलेल्या पैशाबाबत प्रतिक्रिया देतांना हिंगोलीचे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी केशव राऊत यांनी त्या व्यक्तीस आपण ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांचा आपला संबंधच असल्याचे चुकीचे असल्याचे त्यांनी बुधवारी दिव्य मराठीशी बोलतांना स्पष्ट केले.
राज्याच्या गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे गोपनिय पत्र पाठविल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पत्रात महादेव इंगळे नावाची व्यक्ती राज्यातील २९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी संपर्कात असल्याचे नमुद आहे. तर त्याने हिंगोलीचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक केशव राऊत यांच्याकडे सोलापूर येथे बदलीसाठी ५० लाख रुपये मागितल्याचे नमुद आहे.
या संदर्भात राऊत यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता, सदर प्रकार शंभर टक्के चुक असल्याचे त्यांनी सांगितले. महादेव इंगळे नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नाही. पैशाच्या व्यवहाराचा प्रकार असला असता तर आपली बदली झाली असती, मात्र मागील चार वर्षापासून आपण हिंगोली येथे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राऊत हे मागील चार वर्षापासून हिंगोलीत कार्यरत असले तरी त्यांच्याकडे एक वर्षाच्या अधिक काळापासून उस्मानाबाद उत्पादन शुल्क विभागाचा पदभार आहे. हिंगोली ते उस्मानाबाद हे सुमारे ३०० किलो मिटरचे अंतर आहे. एवढ्या लांबवरच्या अधिकाऱ्याला पदभार देण्यामागे काही गौडबंगाल आहे काय याचा शोध घेणे गरजेचे असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर तीन वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. मात्र राऊत चार वर्षापासून हिंगोलीत कसे काय असा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.