आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तार:नवरात्राच्या पहिल्या माळेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार! स्नेहभोजनात सीएम शिंदेंनी सांगितला मुहूर्त

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पितृपक्ष संपल्यावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला २६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा मुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदासाठी इच्छुकांना सांगितला. विस्ताराला आणखी वेळ असल्याने त्या दृष्टीने तुमची मानसिकता बनवा. धीर धरा, असा सल्लाही त्यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदे यांनी भाजप, शिंदे गट, अपक्ष आमदार तसेच काही उद्योजक, कलावंतांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. त्यात नेमके काय घडले याची माहिती देताना विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, शिंदे यांनी मंत्री होण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांची तीन ते चार वेगवेगळे गट करून बैठक घेतली. भोजन सुरू होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर अशा दोन सत्रांत अनौपचारिक गप्पांच्या रूपातच ही बैठक झाली. आधी त्यांनी आतापर्यंत मतदारसंघात काय वातावरण आहे, याची माहिती काही जणांकडून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, महिनाभरापासून चर्चेत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची पूर्ण तयारी झाली आहे. त्यात कोणतेही अडथळे राहिलेले नाहीत. एक-दोन मुद्दे बाकी आहेत. पण त्यावर लवकरच चर्चेतून मार्ग निघेल, असे स्पष्ट केले.

दहा सप्टेंबर रोजी दुपारी पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासारखी मोठी राजकीय हालचाल लगेच करणे शक्य नाही. पितृपक्ष संपल्यावर नवरात्राच्या पहिल्या माळेच्या दिवशी २६ किंवा फार तर २७ सप्टेंबरला तुमच्यापैकी योग्य लोकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्यावर एका आमदाराने ‘आम्ही कार्यकर्ते, मीडियावाल्यांना काय सांगावे’ अशी विचारणा केली. त्यावर शिंदे यांनी त्याच्याकडे नजर रोखत ‘थोडा धीर धरा. मनाने खंबीर राहा. लोकांची कामे करा’ असा सल्ला दिला. दरम्यानच्या काळात राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादीही अंतिम होणार असल्याचे शिंदे म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे आता प्रबळ दावेदार

संजय शिरसाट, अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह आदींसह किमान ५० जण मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.

बातम्या आणखी आहेत...