आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस १८ दिवस तर दहावीच्या परीक्षेस २८ दिवस बाकी आहेत. कोरोनानंतरची ही दुसरी लेखी परीक्षा असेल जी केंद्रांवर होणार आहे. तीन तासांत विद्यार्थ्यांना ८० गुणांचा पेपर सोडवायचा आहे. मात्र त्यासाठी आवश्यक लिखाणाचा वेग विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी आव्हान बनून उभा राहिला आहे. ऑनलाइन पूर्व काळात विद्यार्थी पाच मिनिटांत उत्तरपत्रिकेचे एक पान लिहीत होते. आता मात्र लेखनाचा सराव मंदावल्याने ५ मिनिटांत ते सरासरी १० ओळीच उत्तर लिहीत असल्याचे धक्कादायक वास्तव “दिव्य मराठी’च्या पाहणीत पुढे आले.
अशी केली पडताळणी : दहावी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या लेखनवेगाची केली चाचणी
विद्यार्थ्यांच्या लेखनावर नेमका काय परिणाम झाला आहे हे जाणून घेण्यासाठी शहरातील काही शाळांमधील वीस विद्यार्थ्यांना पाच मिनिटांचा अवधी देऊन अभ्यासक्रमातील विषयावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. परंतु एरवी पाच मिनिटांत एक पान उत्तरे लिहिणे अपेक्षित असताना या वेळी सरासरी दहा ओळीच विद्यार्थी लिहू शकले.
शिक्षक म्हणतात...
लिखाणाचा वेग मंदावला : गेल्या दोन वर्षात ऑनलाइनमुळे लिहिण्याची सवय कमी झाली. विचार करून लिहावे लागते. परंतु ती प्रक्रियाच मंदावली आहे. त्यामुळे लिहिण्याचा वेगही कमी झाला.-रूपाली पाटील, शिक्षिका स.भु. प्रशाला
शुद्धलेखनावर मोठा परिणाम
लिहिण्यासाठी वाचनही आवश्यक आहे. ते कमी झाल्याने शुद्धलेखन बिघडले आहे. मुलांना लिहिण्यासाठी वेळ लागतो आहे. त्यामुळे पेपर कसा पूर्ण होणार याची धास्ती आहे.-सुरेखा महाजन, शिक्षिका मनपा शाळा
लिहिताना अडखळते : रूपेश
माझा आधी लिहिण्याचा स्पीड चांगला होता. परंतु आता पटपट लिहिताना अडखळते आहे. त्यामुळे चुकादेखील होतायत. खाडाखोड जास्त होते. लिहायला वेळ लागतो.
पटकन सुचत नाही : सोनल
लिहिताना सुचत नाही. सुचत नसल्यामुळे लिहिता येत नाही. त्यामुळे माझा लिखाणाचा सराव राहिला नाही.
(नावे बदलली आहेत)
लेखनाची गती वाढवण्यासाठी हे करा : डॉ. सुकुमार नवले
अजूनही वेळ आहे विद्यार्थ्यांनी नीट नियोजन व सातत्याने सराव केल्यास त्यांचा लेखनाचा वेग वाढू शकतो. यासाठी पुढील टिप्स लक्षात घ्याव्यात {पाठ्यपुस्तकाचे वाचन करा {संकल्पना समजून घ्या {वेळेचे नियोजन करा {मिळालेल्या वेळेत रोज एक पान अचूक लिहिण्याचा सराव करा {जे अधिक चांगले सोडवू शकतो त्या प्रश्नांची उत्तरे आधी सोडवा तज्ज्ञ विभागीय शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.