आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:जिल्ह्यात बांबू लागवडीतून शेती पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयोग, सहाशे एकर होणार बांबू लागवड

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यांमध्ये वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आता बांबू लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे. राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत तब्बल सहाशे एकर क्षेत्रावर बांबू लागवड होणार असून या शेतकऱ्यांना बुधवार (ता. १) पासून टिशू कल्चर बांबूची रोपे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात  रोही, रानडुक्कर, हरीण आदी प्राणी जिल्ह्यात मोठ्या संख्येने असून कळपाने राहणाऱ्या या प्राण्यांचा उच्छाद मागील काही वर्षात वाढला आहे. विशेष म्हणजे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराकडून हल्ला करण्याचे प्रकारही वाढले आहेत.

दरम्यान या प्रकाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत बांबूची शेती करण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यात वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वन परिमंडळ अधिकारी प्रिया सावळे, शेख जमील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गाव पातळीवर बांबू अभियानाची माहिती देत त्याचे फायदे ही समजावून सांगितले.

दरम्यान नाल्याकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केल्यास बांबू मुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह थेट शेतात शिरून होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. याशिवाय वन्यप्राणी देखील शेतात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे बांधावर किंवा शेतात बांबूची शेती फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले . 

त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात ६०० शेतकऱ्यांनी बांबूची शेती करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वनविभागाकडे नाव नोंदणी देखील केली आहे. या शेतकऱ्यांना वन विभागाच्या वतीने टिश्युकल्चर बांबूची रोपे दिली जाणार असून एका रोपांसाठी दीडशे रुपयांचे अनुदान दिली जाणार आहे. बुधवारी ता. १  वन विभागाच्या कार्यालयात आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, कामाजी पवार,अॅड. के.के. शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना बांबूची रोपे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान तीन ते चार वर्षात बांबूचे उत्पादन सुरू होत असून हिंगोली जिल्ह्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातच बांबू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा बाहेर राज्यातून बांबू आणण्याचा खर्च वाचणार असून कमी किमतीत बांबू उपलब्ध होतील. याशिवाय कागद उत्पादनासाठी कारखान्याकडून बांबूची खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबूची शेती करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात प्रथमच मोठी लागवड होणार : केशव बाबळे विभागीय वन अधिकारी राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रथमच सहाशे एकर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार आहे बांबूच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना बांधावरील शेतीमधून उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय पाणी व वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यास बांबूची रोपे उपलब्ध करून दिली जातील.

0