आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मान्सूनचे स्कोअर कार्ड:राज्यात अतिवृष्टी; ​​​​​​​जूनमध्ये आतापर्यंत 28 जिल्ह्यांत अति पाऊस, पाच जिल्ह्यांत सरासरी, तीन जिल्ह्यांत तूट

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक ते 12 जून : मुंबई उपनगरात सरासरीच्या 459 टक्के पाऊस

यंदा वेळेआधीच राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने जूनमध्ये आतापर्यंत २८ जिल्ह्यांना आजवरच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत अति पावसाने, तर पाच जिल्ह्यांना सरासरीइतका पाऊस देत चिंब केले आहे. राज्यातील जळगाव, सोलापूर आणि कोल्हापुरात मात्र १२ जूनपर्यंत पावसाची तूट दिसते आहे. दरम्यान, राज्याचा उत्तर किनारा ते लक्षद्वीपपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. परिणामी राज्यात या आठवड्यात अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. कुलाबा वेधशाळेने कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी रेड, तर विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

यंदा मान्सूनने जूनच्या पहिल्या १२ दिवसांतच राज्यातील सर्वच विभागात समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. राज्यात एक जून ते १२ जून या काळात सरासरी ५१.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९२.७ मिमी म्हणजे ८० टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही या काळात ३२ टक्के, मराठवाड्यात ७१ टक्के, तर ४० टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांत एक ते १२ जून या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, तर पाच जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस झाला आहे.

कोकणात रेड, तर मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट
कुलाबा वेधशाळेने १३ ते १६ जून या काळासाठी कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

ग्रीन अलर्ट
औरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ६५ मिमीपर्यंत पावसाची शक्यता.

रेड अलर्ट
मुंबई, रायगड, रत्नागिर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी २०४.५ मिमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

यलो अलर्ट
परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे ६४ ते ११५ मिमी पाऊस शक्य.


बातम्या आणखी आहेत...