आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सिजनचा प्रवास:फॅक्टरी ते फुप्फुसे; ऑक्सिजन निर्मितीसाठी झटणारे शेकडो हात; 80 जणांची टीम करतेय 24 तास काम

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 9 प्लँटमध्ये सुरू आहे काम

1. निर्मिती - गॅस आणि लिक्विड या दोन प्रकारांत वैद्यकीय ऑक्सिजन तयार करतात
औरंगाबादजवळील चितेगावच्या आर. एल. स्टीलच्या प्लँटमधील कामगारांना बोलण्याचीही उसंत नव्हती. एरवी स्वत:च्या उत्पादनांपुरता ऑक्सिजन तयार करणारा हा प्लँट शासनाने अधिग्रहित केला आहे. त्यामुळे स्वत:च्या स्टीलच्या उत्पादनासोबतच येथे ऑक्सिजन उत्पादनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ७५० ते ८०० जंबो सिलिंडर ऑक्सिजनची इथे निर्मिती होत आहे. दिवसात ९ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ८० जणांची टीम २४ तास झटत आहे. सगळ्यांच्या बोलण्यात एकच भावना व्यक्त होत होती, आजच्या घडीला हीच देेशसेवा!

आर. एल. स्टीलसह औरंगाबादमधील पाच कंपन्यांमधील ऑक्सिजन प्लँटमधून शासनासाठी ऑक्सिजन उत्पादन सुरू आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्हे मिळून ९ प्लँट. वैद्यकीय ऑक्सिजनची विभागाची गरज आहे, १७८ मेट्रिक टन ऑक्सिजन. त्यासाठी ४८० कामगार चोवीस तास राबत आहेत. तरीही तो पुरत नाहीए. विभागातील २ हजार रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे पुणे, रायगड या अन्य जिल्ह्यांमधून मराठवाड्यातील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन मागवण्यात येत असल्याची माहिती औरंगाबाद येथील औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

दोन प्रकारे तयार होतो ऑक्सिजन
वैद्यकीय ऑक्सिजन दोन प्रकारे तयार करतात, कंपनीचे संचालक प्रवीण निझामपूरकर सांगत होते. एक पद्धत म्हणजे एअर सेपरेशन पद्धती (गॅस ऑक्सिजन) आणि दुसरी म्हणजे रिफिलिंग (लिक्विड ऑक्सिजन). लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक सोपी असते आणि तो एकाच स्रोताद्वारे अनेक रुग्णांना पुरवता येतो. मात्र त्यात ऑक्सिजन वाया जाण्याची शक्यता अधिक असल्याचे कंपनीचे मेंटेनन्स प्रमुख अमोल पालेकर सांगत होते. सिलिंडरमध्ये मिळणारा गॅस ऑक्सिजन थेट वापरता येतो.

एअर सेपरेशन पद्धतीने केली जाते निर्मिती
चितेगावच्या प्लँटमध्ये एअर सेपरेशन पद्धतीने ऑक्सिजनची निर्मिती होते. त्यासाठी कॉम्प्रेसरमध्ये नैसर्गिक हवा घेऊन तिला उणे १८३ अंश सेल्सियसवर थंड करून त्यातील ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगळा करतात. त्यानंतर ऑक्सिजनमधील आर्द्रता, कार्बन, अल्युमिनियम, धूळ वेगळी करून तो शुद्ध केला जातो. हा शुद्ध ऑक्सिजन पाण्याच्या रूपात येतो. त्याला पुन्हा तापवून वाफेत रूपांतरित करून सिलिंडर भरले जातात.

हवेतून द्रवरूपात आणला जातो ऑक्सिजन
यात नैसर्गिक हवेतून द्रवरूपात आणलेला ऑक्सिजन टँकमध्ये भरला जातो. या टँकमध्ये त्याचे वाफेत रूपांतर होऊन सेंट्रल ऑक्सिजन पद्धतीने तो रुग्णाला दिला जातो. यामुळे एकाच वेळी अनेक रुग्णांना हा ऑक्सिजन पुरवठा सुरू असतो. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या रुक्मिणी गॅसेस, सागर गॅसेस, सुशील गॅसेस, झांबड गॅसेस आणि आता आर. एल. स्टील हे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करणारे ५ पुरवठादार आहेत.

2. वाहतूक - कोट्यवधींचे टँकर, वेगवान आधुनिक यंत्रणा
शहरात प्रवेश करण्यापूर्वीच विल्होळी शिवारातील जाधव ऑक्सिजन प्लँटपुढे सध्या गाड्यांची रांग लागलेली दिसते. जिल्ह्यातील सव्वादोनशेहून अधिक रुग्णालयांसाठी येथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मुरबाड येथील प्राएक्सर आणि तळोजा येथील लिंडे या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांमधून हे ऑक्सिजन आणून नाशिकमधील रुग्णालयांपर्यंत वितरित करतात. त्यासाठी त्यांनी तब्बल अडीच कोटींचे दोन खास टँकर्स खरेदी केले आहेत. ही वेळ नफा कमावण्याची नाही तर सेवेची असल्याचे पुरवठादार अमोल जाधव यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. उत्पादक कंपन्यांमधून टँकरमधून आणलेला ऑक्सिजन पुरवठादारांच्या प्लँटवरील टाक्यांमध्ये टाकला जातो. नाशिकपर्यंत हे टँकर्स पोहोचायला किमान तीन तास लागतातच. पुढील जिल्ह्यांना अधिक वेळ. एका टँकरमधून ३५ हजार किलोलीटर ऑक्सिजनची वाहतूक करण्यात येते. प्लँटवरील टाक्यांमधून तो सिलिंडर्समध्ये भरला जातो. वीस मिनिटाला २०० लिटरचे १० सिलिंडर्स भरले जातात.

रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी क्षणाक्षणाचा ऑक्सिजन पुरवठा गरजेचा असला तरी उत्पादन आणि वाहतूक यातील हा वेळ अधिकाधिक कमी करण्याचा प्रयत्न पुरवठादार करीत आहेत. एरवी कंपन्यांसाठी ऑक्सिजन पुरवण्याचा व्यवसाय करणारे हे पुरवठादार सध्या नफा बाजूला ठेवून प्रशासनाच्या सोबत समन्वय साधून रुग्णालयांच्या ऑक्सिजनच्या गरजा पूर्ण करीत आहेत. काही रुग्णालयांना पुरवठादार त्यांच्या वाहनांमधूनच जंबो सिलिंडर्सद्वारे ऑक्सिजन पुरवत आहेत, तर काही रुग्णालये त्यांच्या गाड्या पाठवत आहेत. विशेषत: ग्रामीण रुग्णालयांमधून सिलिंडर्स नेण्यासाठी त्यांची वाहने पुरवठादारांकडे येत आहेत. पुरवठादाराकडून ऑक्सिजन नेण्यासाठी दररोज ५०-६० वाहनांची रांग लागते आहे.

3. वापर - तीन टप्पे पार करत ऑक्सिजन अखेर पोहोचतो रुग्णांपर्यंत..!
कोविड रुग्णालयात अाॅक्सिजनचा पुरवठा झाल्यापासून ते रुग्णांपर्यंत पाेहोचण्यासाठी त्याला तीन टप्पे पार करावे लागतात. अर्थात या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रणासाठी खास यंत्रसामग्री व यंत्रणा कार्यान्वित करण्यात येते. काेराेनाच्या बाधितांवरील उपचारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर समस्या निर्माण झालेली अाहे. त्यासाेबतच त्याच्या उत्पादनापासून थेट रुग्णांपर्यंतचा प्रवास हा प्रशासनाच्या देखरेखीखाली अाला अाहे. रुग्णालयात सामान्यपणे रुग्णांना वापरण्यात येणारा ऑक्सिजन हा गॅस स्वरूपातील असायचा. परंतु अाता माेठ्या प्रमाणावर अाॅक्सिजनची अावश्यकता असल्याने लिक्विड स्वरूातही उपलब्ध हाेत अाहे. त्याचे गॅसमध्ये रूपांतर करण्यात येते. म्हणजेच गॅस व लिक्विड या दाेन्ही फाॅर्ममध्ये ऑक्सिजन रुग्णालयात येते. पुढे तो गॅस सिलिंडर किंवा सेंट्रल पाइपलाइनद्वारे रुग्णापर्यंत या दोन पद्धतीने अाॅक्सिजन रुग्णापर्यंत पाेहोचवला जातो.

सेंट्रल सिस्टिम....
एकाच वेळी अधिक रुग्णांची अाॅक्सिजनची अावश्यकता पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी अनेक सिलिंडर लावून ते ‘मॅनिफाेल्ड’ या यंत्राला जाेडून काॅपर पाइपलाइनद्वारे वाॅर्डात रुग्णांच्या बेडपर्यंत अाॅक्सिजन पाेहोचवतात. काॅपर पाइपलाइनला अनेक अाऊटलेट असतात. अाऊटलेटची नळी रुग्णांच्या अावश्यकतेनुसार फ्लाेमिटर, अाॅक्सिजन मास्क, मास्क बॅग, हायफ्लाे मास्क यांना जाेडली जाते. त्यातून रुग्णांना अाॅक्सिजनचा पुरवठा केला जाताे.

अशी असते ऑक्सिजनची पातळी
अाॅक्सिजनची पातळी कृत्रिम अाॅक्सिजन अावश्यकता
94 ते 90 2 लिटर प्रतिमिनिट
90 ते 80 15 लिटर प्रतिमिनिट
70 ते 60 15 लिटर/मि., हायफ्लाेमास्क
60 पेक्षा कमी 30-60 लिटर/मि. व्हेंटिलेटर

बातम्या आणखी आहेत...