आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीत इंग्रजीत नापास झालो. मात्र आई, वडील, भाऊ, मामांनी दिलेले पाठबळ व जिद्द कायम ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. आज हिंगोली जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. विशाल राठोड यांचे यश त्यांच्यात शब्दात..
अहो बारावीचे काय घेऊन बसलात, सातवीलाच उनाडक्या करत असल्याने शाळेतून काढून दिले होते. मात्र, त्यानंतर शिक्षकांनाच दया आली अन् अ वर्गातून क वर्गात टाकले. मग शाळा सुरू झाली. उनाडक्या कमी झाल्या नाहीत. कसाबसा दहावी पास झालो. अकरावी विज्ञान शाखा निवडली. बारावीला इंग्रजी विषयात नापास झालो. हाती मार् कमेमो पडला. मग काय करावे कळत नव्हते. माझ्यासोबत माझ्याच बेंचवर बसणारा सख्खा भाऊ पास झाला, मी मात्र नापास झालो. माझी परिस्थिती वडिलांनी समजून घेतली अन् आई-वडिलांनी समजूत काढली. वडिलांनी पुणे येथे मामा प्राचार्य बबन पवार व मोठा भाऊ भारत राठोड यांच्याकडे पाठवले. त्या वेळी दोघेही संघर्ष करून शिक्षण घेत होते. भाऊ भारत तर हॉटेलमध्ये काम करून अभ्यास करत होता. त्या दोघांनीही माझ्यातील जिद्द पेटवली. पुणे विद्यापीठातील जयकर वाचनालय दाखवले. त्या ठिकाणची परिस्थिती, अभ्यास करणारे विद्यार्थी, मामा व भाऊ कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत हे लक्षात आले. तोच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
माझा मोठा भाऊ भारत राठोड यांनी माझा परळीलाच पुन्हा बारावीला प्रवेश घेतला. या वेळी मात्र मन लावून अभ्यास केला. बायोलॉजी ग्रुपमध्ये ९० टक्के गुण मिळवले. त्यानंतर नागपूर येथे बीएएमएस व एमडीचे शिक्षण पूर्ण केले. २००६ मध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर नोकरीला लागलो. त्यानंतर पुन्हा तीन महिने पुणे येथे येऊन लोकसेवा आयोगाची परीक्षा कशी असते, अभ्यास कसा करावा याची माहिती घेतली. त्यानंतर दवाखान्यात रुग्ण नसताना व इतर वेळी अभ्यास केला, तर आठवड्यातून दोन दिवस मित्रांसोबत ग्रुप चर्चा करू लागलो. त्यातून मित्र कसे अभ्यास करताहेत आपण कुठे आहोत याची माहिती मिळत गेली. स्वतःच्या अभ्यासात बदल करत गेलो.
राज्यात दुसरा क्रमांक
घरची आर्थिक परिस्थिती बदलायची, अधिकारी होऊन दाखवायचे ही जिद्द बाळगून अभ्यास केला. आयोगाच्या परीक्षेत विमुक्त जाती भटक्या प्रमाती प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. त्या वेळी पोलिस उपाधीक्षक हे पद नाकारून गटविकास अधिकारी वर्ग एक या पदावर नियुक्ती मिळाली. आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद हिंगोली येथे कार्यरत आहे.
शब्दांकन - मंगेश शेेवाळकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.