आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरालगत आनंदनगर भागातील बनावट नोटा प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने विदर्भातील पुसद येथून गुरुवारी (ता. ४) पहाटे आणखी दोघांना अटक केली असून त्यांनी मागील तीन वर्षापासून विदर्भातही बनावट नोटा चलनात आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षकांनी पथकाला पारितोषीक देऊन त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे.
हिंगोली शहरालगत आनंदनगर भागात बनावट नोटा छापणाऱ्या संतोष सुर्यवंशी (देशमुख) व छाया भुक्तार या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी सुरु केली आहे. त्यांच्या चौकशीमध्ये पुसद येथील दोघे जण त्याच्या सोबत काम करीत असल्याची माहिती पुढे आली. त्यावरून पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक रामेश्वर वैंजने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जून पडघन, विजय घुगे यांच्या पथकाने बुधवारी ता. ३ मध्यरात्री पुसद येथे जाऊन शोध मोहिम सुरु केली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास शेख इम्रान व विजय कुरुडे (रा. पुसद) यांना अटक केली आहे.
दरम्यान, वरील दोघेही संतोष सुर्यवंशी (देशमुख) याच्या मागील तीन वर्षापासून संपर्कात होते. तीन वर्षापासून ते बनावट नोटा घेऊन विदर्भात चलनामध्ये आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुसद येथे आणखी काही जणांना नोटा दिल्या काय याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. तर यामध्ये आणखी काही जण सहभागी असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांच्या पाठीवर कौतूकाची थाप
हिंगोलीच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड केला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी उपाधिक्षक रामेश्वर वैजने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जून पडघन, विजय घुगे यांचा आज प्रशस्तीपत्र व रोख पारितोषीक देऊन त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.