आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:निवडणुकांमधून बनावट नोटा आल्या चलनात? काही राजकिय मंडळी पोलिसांच्या रडारवर; लवकरच चौकशी होण्याची शक्यता

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी हिंगोली शहरालगत बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश केला होता

हिंगोलीतील बनावट नोटांचे प्रकरण राजकारणापर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासामध्ये स्पष्ट होत असून मागील काही निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर या बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता काही राजकिय मंडळी देखील पोलिसांच्या रडारवर असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

हिंगोली येथील आनंदनगर भागातील बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी युध्द पातळीवर तपास सुरु केला आहे. यामध्ये पोलिसांनी आता पर्यत चौघांना अटक केली असून सध्या चौघेही पोलिस कोठडीत आहे. यामध्ये दोघे जण विदर्भातील पुसद येथील आहेत.

दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रामेश्‍वर वैंजने, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जून पडघन, विजय घुगे यांच्या पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून माहिती घेण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे कनेक्शन विदर्भापर्यंत पोहोचले असून त्या ठिकाणावरून दोघांना अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणात काही राजकिय मंडळी संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. मागील काही निवडणुकांमधून बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांकडून मराठवाडा व विदर्भातील काही राजकिय मंडळींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. काही मंडळी पोलिसांच्या रडारवर असून पोलिस त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बनावट नोटांचे राजकिय कनेक्शन उघडकीस येणार काय याची उत्सुकता लागून राहिली आहे.

या संदर्भात पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याचे सांगितले. राजकिय कनेक्शन बाबत मात्र त्यांनी सध्या काही सांगता येणार नसल्याचे सांगत प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व पथके योग्य पध्दतीने तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.