आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना सरला, पण घोटाळे थांबेनात:औरंगाबादेत लसीच्या बनावट नोंदी; कंत्राटी डॉक्टर, कर्मचाऱ्यावर गुन्हा, चुकीचे मोबाइल क्रमांक टाकून नोंदी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्राॅन कोविड सेंटरमध्ये बनावट डिस्चार्ज प्रकरणानंतर आता नवा घोटाळा उघडकीस आला आहे. कंत्राटी डॉक्टर, महिला संगणक ऑपरेटरनेच लस दिल्याच्या बनावट नोंदी केल्याचे समोर आले आहे. डॉ. कॅनेडी झेन मॅथ्यू व संगणक ऑपरेटर साबरी मोहंमद इम्रान यांनी मागील चौदा दिवसांत ८० जणांकडून पैसे घेऊन अॅप व रजिस्टरवर लस घेतल्याच्या खाेट्या नोंदी केल्या. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मुदगडकर यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

३० मार्च रोजी संगीता शिंदे या कोरोना लसीकरणाच्या रजिस्टरमध्ये हाताने नोंदणी करत असल्याचे दिसले. तेव्हा डॉ. मुदगडकर यांनी रजिस्टर तपासले असता हस्ताक्षरात तफावत आढळली. त्यांनी संगीता व इतरांना विचारणा केली असता ते सर्व हस्ताक्षर कॅनेडी व साबरी यांचे असल्याचे सांगितले. साबरी यांनी डॉ. कॅनेडीच्या सांगण्यावरून नोंदी केल्याचे सांगितले. शंका आल्याने डॉ. मुदगडकर यांनी सखोल तपास केला असता दोघांनी मिळून सर्व नोंदीच चुकीच्या केल्याचे समोर आले. लस घेण्याची इच्छा नाही, परंतु लसीचे प्रमाणपत्र पाहिजे अशा लाेकांकडून पैसे उकळून नोंदी केल्याचे आढळले. त्यानंतर डॉ. मुदगडकर यांनी पाेलिसात तक्रार दिली.

८० जणांना बोगस प्रमाणपत्र वाटल्याचे उघडकीस
नेमका कसा केला घोटाळा ॽ

-डॉ. कॅनेडी व साबरी मागील दोन वर्षांपासून कंत्राटी नोकरीवर आहेत. कॅनेडीची जबाबदारी रुग्णांची तपासणी करण्याची होती, तर साबरी संगणक ऑपरेटर होती.
- कॅनेडीने कोरोना लसीकरण रजिस्टरमध्ये हस्ताक्षरात नोंदी घेऊन लोकांचे मोबाइल नंबर व आधार कार्ड क्रमांक चुकीचे लिहिले. पैसे घेऊन लस न देताच अॅपवर दाेन्ही लस घेतल्याचा नोंदी केल्या. परिणामी त्या सर्वांना तसे प्रमाणपत्र मिळाले.
- हा प्रकार समोर आल्यानंतर मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रजिस्टरमध्ये नोंद केलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता ते क्रमांक चुकीचे निघाले. रजिस्टर व अॅपमधील क्रमांकात तफावत होती. रेकॉर्डचा ताळमेळ साधण्यासाठी डॉक्टरने सर्व लस नष्ट केल्या. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच दोघेही मोबाइल बंद करून फरार झाले.
- हा घोटाळा चौदा दिवसांचा आहे. दोघांनी अनेक महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

फोन लागला अन‌् धांदल उडाली
मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर काही क्रमांक अवैध निघाले तर काही फोनवर संपर्क झाला. मात्र, मेल्ट्रॉनमधून लसीसंदर्भात कॉल असल्याचे कळताच अनेकांची धांदल उडाली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती सांगण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे हा सर्व प्रकार खोटे प्रमाणपत्र देऊन खोट्या नोंदी केल्याचे स्पष्ट झाले. जिन्सी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी ट्या नोंदी करून बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर भावांना अटक केली होती.

चौकशीसाठी पाच जणांची समिती
डॉ. कॅनेडी व साबरी यांच्यावर गुन्हा दाखल हाेताच त्यांना कामावरून कमी करण्यात आले. याप्रकरणी मनपा प्रशासनाच्या वतीने डॉ. मनीषा भोंडवे, डॉ. संगीता पाटील, डॉ. मेघना जोगदंड, मीना ठोकळ, डॉ. प्रेरणा संकलेचा यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन दिवसांत ही समिती चौकशीचा अहवाल देईल, असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...