आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘फॅम’ने आठ वर्षांत महापरिनिर्वाणदिनी जमा केले 5 लाख वह्या-पेन ; 1 लाख विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

औरंगाबाद / डाॅ. शेखर मगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी ‘फेस ऑफ आंबेडकराइट मूव्हमेंट’ गेल्या आठ वर्षांपासून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करत आहे. गरीब, वंचित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांकडून ‘एक वही, एक पेन’ दान स्वरूपात घेतले जाते. २०१४ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत आठ वर्षांत ५ लाख वह्या, ५ लाख पेन जमा झाले आहेत. त्यातील एक लाख विद्यार्थ्यांना त्याचे वितरणही केले आहे. २ जिल्ह्यांतून सुरू झालेली ही मोहीम आता २०२२ पर्यंत २८ जिल्ह्यांपर्यंत पोहाेचली आहे.

शोषित, वंचित आंबेडकर अनुयायी आता थोडेफार सधन झाले आहेत. प्रत्येक महापरिनिर्वाणदिनी मुक्तिदात्याला ठिकठिकाणी वंदन करण्यासाठी त्यांची पावले पडतात. विशेषत: मुंबईच्या चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी जातात. चैत्यभूमीसह प्रत्येक जिल्ह्यात पुष्पहार, फुले, मेणबत्ती, अगरबत्ती अर्पण केले जाते. पण त्याचे रूपांतर दुसऱ्या दिवशी निर्माल्यातच होते. अभिवादन साहित्याच्या या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. पण, त्याचा योग्य विनियोग होत नाही.

बाबासाहेबांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यांच्या या व्हिजनला पुढे नेण्यासाठी ‘फेस ऑफ आंबेडकराइट मूव्हमेंट’ आठ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. विभूतीपूजेऐवजी अनुयायांनी ‘एक वही, एक पेन’ दान करून अभिवादन करावे, असे आवाहन अभियानचे प्रमुख विश्वजित करंजीकर यांनी २०१४ मध्ये सर्वप्रथम केले होते. नष्टप्राय होणाऱ्या साहित्याची खरेदी करण्याऐवजी ‘एक वही, एक पेन’ अर्पण करा असे ते आवाहन होते. यात डॉ. महेश बनसोडे, गौतम बावसकर, विश्वदीप करंजीकर, शैलेश चाबुकस्वार, विशाल आढाव, आशिष पाटील, मनीष नरवडे, उमाकांत बोराडे, राज अहिरे, बारकु आरके आदी अभियानचे काम पाहत आहेत.

आतापर्यंत बाबासाहेबांची २५०० आत्मचरित्रे जमा २०१४ मध्ये औरंगाबाद व मुंबईतून सुरू झालेली ही चळवळ आता २८ जिल्ह्यांत सुरू आहे. गेल्या वर्षीपासून छत्तीसगडच्या दुर्ग, भिलई आणि रायपूरपर्यंत, कर्नाटकच्या गुलबर्गा येथेही दोन वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. पेन्सिल्सचे बाॅक्स, २ हजार स्कूल बॅग दिल्या आहेत. लोकांनी स्वेच्छेने आतापर्यंत बाबासाहेबांची २५०० आत्मचरित्रे दिली. तीनशेपेक्षा अधिक ‘बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथ’ आलेत. तेही ‘फॅम’ने वितरित केले.

शैक्षणिक चळवळीत सर्वांनी भाग घ्यावा आम्ही जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिकांच्या शाळांना भेटी देऊन गरजू विद्यार्थ्यांची यादी घेतो. त्यातील प्रत्येकाला ५ वह्या व २ पेन देतो. झोपडपट्टी, वीटभट्टयांवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना दप्तर, शालेय साहित्य देतो. या चळवळ सहभागी होण्यासाठी ७२७६३३२४९८, ८२७५९३७४५६, ९५४५५१५४१५ या मोबाइल क्रमांवर संपर्क करावा. -विश्वजित करंजीकर, समन्वयक, फॅम

बातम्या आणखी आहेत...