आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर; आर्थिक मदतही नाही, अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी कुटुंबाचे हेलपाटे

औरंगाबाद \ उषा बोर्डे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमा गिड्डे यांचे पती दशरथ पंढरपूर आगारात सहायक पदावर कार्यरत होते.  दशरथ यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी आत्महत्या केली. आपल्या मुलांसह उमा गिड्डे. - Divya Marathi
उमा गिड्डे यांचे पती दशरथ पंढरपूर आगारात सहायक पदावर कार्यरत होते. दशरथ यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी आत्महत्या केली. आपल्या मुलांसह उमा गिड्डे.

एसटीच्या संपकाळात आतापर्यंत राज्यातील ५० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे आश्वासन महामंडळाने दिले होते. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांचा सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी डिसेंबर २०२१ मध्येच सांगितले होते. तशी चाचपणी करण्याचे आदेशही एसटी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर मात्र काहीच हालचाली झाल्या नसल्याने आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना नोकरीपूर्वी किमान आर्थिक मदत तरी दिली जावी, अशी मागणी होत आहे.

खंडपीठात याचिका दाखल : औरंगाबाद खंडपीठात एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अ‍ॅड. पुष्पा बाबासाहेब येळवंडे यांनी अ‍ॅड. सुविध कुलकर्णी आणि अ‍ॅड. प्रतीक्षा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल केली. पुष्पा यांचे पती एसटीत चालक म्हणून कार्यरत आहेत. एसटी कर्मचाऱ्याची पत्नी म्हणून वाढत्या आत्महत्या थांबवण्यासाठी व एसटीची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी ही पहिली याचिका पुष्पा यांनी दाखल केली. सरकारने या कर्मचाऱ्यांचा विचार करावा, असे पुष्पा यांचे म्हणणे आहे.

केस १ : योगिता बेडसे
धुळे जिल्ह्यातील साक्री आगारातील याेगिता बेडसे यांचे पती तथा बसचालक कमलाकर भिकन बेडसे यांनी २७ ऑगस्ट २०२१ रोजी घरात गळफास घेतला. त्यांना दोन मुले आहेत. पती गेल्यापासून त्या शिलाईचे काम करून उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांचे शिक्षण एमए बीएडपर्यंत झाले आहे. या शैक्षणिक पात्रतेवर त्यांना वाहतूक निरीक्षक पद दिले जाईल, असे सांगितले गेले. कागदपत्रांची पूर्तता करून सहा महिने लोटल्यानंतरही त्यांना नोकरीची ऑर्डर मिळाली नाही.

केस २ : गंगासागर सानप
गंगासागर तुकाराम सानप या बीड जिल्ह्यातील तागडगावात शेतीत काम करून दोन मुलांचा खर्च भागवतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे पती तुकाराम त्र्यंबक सानप बीड आगारात चालक होते. त्यांना १२ हजार पगार होता. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आत्महत्या केली. पतीच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, अशी गंगासागर यांची इच्छा आहे. त्या बीड आगारात जाऊन आल्या. पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

केस ३ : उमा गिड्डे
उमा दशरथ गिड्डे यांचे पती पंढरपूर आगारात सहायक पदावर कार्यरत होते. सासूबाईच्या कॅन्सरवरील उपचार तसेच स्वत:च्या डोळ्यांच्या उपचारासाठी दशरथ गिड्डेंनी कर्ज काढले होते. त्यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी आत्महत्या केली. उमा यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांना हेल्पर म्हणून काम मिळू शकते किंवा मुलाला नाेकरी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...