आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाचे नुकसान:जुलै महिन्यात अति पावसामुळे शेती पाण्यात; ऑगस्ट महिन्यात खंड पडल्याने करपताहेत पिके; कुठे धो-धो तर कुठे पावसाचा थेंबही नाही

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • 13 ते 20 दरम्यान पावसाची शक्यता

मराठवाड्यात जुलैमध्ये चांगला झाला. ४८ लाख १६ हजार ९६७ हेक्टरपैकी ४७ लाख ६ हजार १०२ हेक्टर म्हणजेच ९७.७० टक्क्यांवर प्रत्यक्ष पेरणी झाली. पण ऑगस्टमध्ये मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने १२१ टक्के पाऊस पडूनही चिंता वाढली आहे. फुलोऱ्यात असलेली सोयाबीन, मूग, उडीद पिके जळू लागली आहेत. फुले, कळ्या कोमेजून चालल्या आहेत. आठ दिवसांत पाऊस आला नाही तर नुकसानीची शक्यता आहे.

सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जेथे लवकरच पेरणी झाली तेथे शेंगा लगडल्या आहेत. पण गेल्या ११ दिवसांपासून पावसाने ओढ दिली. त्यामुळे फुलोऱ्याची गळ होत आहे. शेंगा लगडल्या पण त्यात दाणे भरले नाहीत. कपाशीला पाते लागले पण त्याचे बोंड तयार होण्यासाठी पाणी कमी पडत आहे. अशीच स्थिती सर्व पिकांची असून याचा परिणाम थेट उत्पादनावर होईल.

परभणी : सोयाबीनवर मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव
परभणी | जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या झाल्या. जुलैमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला. आता ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडामुळे पुन्हा पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात खरिपाच्या हंगामात, विशेषतः सोयाबीन, कापूस, हळद यांचे उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टीनंतर व पावसाच्या खंडामुळे वातावरणातील बदलामुळे सोयाबीनवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, खोडमाशी, चक्री भुंगे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

८ अंश तापमान वाढ
३० जुलै रोजी औरंगाबाद शहर परिसरात ढगांची आकाशात गर्दी होती व हलका पाऊस पडत होता. सूर्यदर्शन दुर्लभ होत होते. त्यामुळे कमाल तापमान २६ अंशांवर खाली आले होते. मध्य प्रदेश, राजस्थान आदी ठिकाणी कमी हवेचा दाब तयार होऊन महाराष्ट्रावरील पाऊस तिकडे गेला. आपल्याकडे गत ११ दिवसांत मोठा पावसाला हुलकावणी मिळाली. तापमानातही ८ अंशांनी वाढ होऊन ते गत तीन दिवसांपासून ३२ ते ३३ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. सरासरी तापमान २९ अंश सेल्सियस असायला हवे होते. म्हणजेच ३ ते ४ अंशांनी मोठी वाढ तापमानात झालेली आहे. यामुळे उकाडा वाढला.

कोणत्या पिकांवर काय परिणाम

  • सोयाबीन : सोयाबीनवर रस शोषण करणाऱ्या किडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. पीक कोमेजून जाण्याची शक्यता.
  • कापूस : मावा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव. माव्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम. पिकांची वाढ खुंटते
  • हळद : कंद माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. उत्पादन घटण्याची शक्यता.

पिकांवर परिणाम?
सोयाबीन, कापूस, हळद या प्रमुख पिकांसह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे यावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. अन्यथा पीक उत्पादनात घट होऊ शकते.

पाऊस १२१% जास्त तरी धोका?
११ ऑगस्टपर्यंत ३८८.८ मिमी अपेक्षित पाऊस होता. त्या तुलनेत ४७४.१ मिमी म्हणजे १२१.९ टक्के पाऊस पडला आहे. कमी वेळेत धो-धो पाऊस पडल्याने पावसाची टक्केवारी वाढली. पण यंदा प्रकल्पांत कमी पाणीसाठा आहे.

स्थळनिहाय पावसात फरक का?
हवामान बदलामुळे जेथे अनुकूल तापमान, १०० टक्के सापेक्ष आर्द्रता, कमी हवेचा दाब, बाष्पयुक्त पावसाच्या ढगांची गर्दी तयार होते तेवढ्याच पट्ट्यात पाऊस पडतोय. म्हणजेच कुठे धो-धो तर कुठे पावसाचा थेंबही पडत नाही. कमी दिवसांतील अत्यल्प वेळेत झालेल्या अतिवृष्टीमुळे जुलैत मराठवाड्यात पावसाची सरासरी वेगाने वाढली.

१३ ते २० दरम्यान पावसाची शक्यता
१३ ते २० ऑगस्टदरम्यान तुरळक प्रमाणात पावसाचा अंदाज असणार अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे व पिकांवरील किडींचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले. तर एक ओळी आड चर, दांड काढावा. पिकांना चराने पाणी पाणी द्यावे. मावा, तुडतुडे, फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकाआड एक लावावेत, असे आवाहन हवामान शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...