आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज जमीन विकूनही फिटत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना कडेठाण (ता. पैठण) येथे बुधवारी (३ मे) सकाळी उघडकीस आली.
काकासाहेब निवृत्ती तवार (61 ) असे विष घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काकासाहेब तवार यांची कडेठाण शिवारात 3 एकर शेती आहे. त्यात ते हंगामी पिके घेतात. मात्र, उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असल्याने तिन्ही मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडावे कसे या विवंचनेत ते होते. कर्ज फेडण्यासाठी शेवटी त्यांनी काही जमीन विक्रीदेखीलकेली होती. मात्र, तरी कर्ज फिटले नाही.
घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवले. दुपारी कडेठाण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले . याप्रकरणी पाचोड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद केली. सहायक पाेलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार संतोष चव्हाण तपास करताहेत . काकासाहेब तवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे.
कर्जामुळे आत्महत्या
वडिलांच्या डोक्यावर 5 लाखांचे कर्ज वडील काकासाहेब तवार यांच्याकडे खासगी उसनवारीचे तीन लाख व एसबीआय बँकेचे दोन लाख असे जवळपास 5 लाख रुपयांचे कर्ज होते.
-विश्वास तवार, मृत शेतकरी यांचा मुलगा
विवंचनेत वावरत हाेते
कर्ज फिटत नव्हते, उलट कर्जाचा डोंगर वाढत गेला सततच्या नापिकी व अवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे सलग तीन-चार वर्षांपासून शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यात उत्पन्नाचे शेतीशिवाय दुसरे साधन नसल्याने काकासाहेब निवृत्ती तवार यांच्यावर असलेले कर्ज फिटत नव्हते, उलट कर्जाचा डोंगर वाढतच होता. या विवंचनेत ते अनेक दिवसांपासून वावरत हाेते.
-प्रतिभा संभाजी तवार, सरपंच, कडेठाण
सहा एकरपैकी राहिली फक्त तीन एकर शेती
कापसाला भाव मिळाला नाही म्हणून होते हतबल काकासाहेब तवार यांनी तीन एकरात त्यांना २० क्विंटल कापूस झाला. भाव मिळेल या आशेवर त्यांनी खूप दिवस कापूस घरातच ठेवला होता. परंतु, कर्ज डोक्यावर असल्याने परतफेड करण्यासाठी त्यांना कापूस विकावा लागला. कापसाला केवळ ६ हजार भाव मिळाला. भाव कमी अन् खर्च जास्त झाला. यामुळे ते हतबल झाले होते, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
आडूळला जाऊन आणले कीटकनाशक
काकासाहेब तवार हे मंगळवारी (२ मे) सकाळी आडूळ येथील आठवडी बाजाराला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले हाेते. त्यांनी आडूळला जाऊन पिकाच्या फवारणीसाठी म्हणून औषधी खरेदी केले. यानंतर कडेठाण शिवारातील शेतीकडे गेले अाणि त्यांच्या शेताशेजारील शेतात विष प्राशन केले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. बुधवारी सकाळी परत त्यांचा शोध सुरू केला असता त्यांचा मृतदेह त्यांच्या शेताजवळ आढळला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.