आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्रदय द्रावक घटना:मुलींच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फिटत नसल्याने कडेठाण येथे शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज जमीन विकुनही फिटत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी औषधी प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपविली. ही गंभीर घटना कडेठाण (ता. पैठण) येथे बुधवारी (दि. ३) रोजी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, काकासाहेब निवृत्ती तवार (वय ६१ वर्षे, रा. कडेठाण, ता. पैठण) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते मंगळवारी (दि.२) रोजी सकाळी आडुळ येथील आठवडी बाजाराला जातो, असे सांगून घरातून निघाले होते. त्यानंतर ते आडुळला आले व येथुन पिकाच्या फवारणीसाठी म्हणून औषधी खरेदी केले.

यानंतर ते त्यांच्या कडेठाण शिवारातील जमिनीकडे गेले व त्यांच्या शेताशेजारील शेतात विषारी औषध प्राशन केले. ते मंगळवारी रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने साऱ्या गावात व आडुळ परिसरात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला पण ते रात्रीपर्यंत सापडले नाही.

बुधवारी सकाळी परत त्यांचा शोध सुरु केला असता त्यांचा मृतदेह त्यांच्या शेताजवळ आढळून आला. हि घटनेची माहिती पाचोड पोलीसांना दिल्यानंतर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी कडेठाण येथे अंत्यविधी करण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली. ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संतोष चव्हाण तपास करीत आहेत. काकासाहेब तवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तिन मुली, जावई असा परिवार आहे.

अल्पभुधारक शेतकरी

काकासाहेब तवार यांची कडेठाण शिवारात ३ एकर शेती असुन त्यात ते हंगामी पिके घेतात. मात्र, उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असल्याने तिन्ही मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडावे कसे या विवंचनेत ते राहत होते. कर्ज फेडण्यासाठी शेवटी त्यांनी काही जमीन विक्री देखील केली होती. मात्र तरी कर्ज फिटले नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी विष प्राशन करुन आपली जीवन याञा संपविल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.