आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पोतरा येथे अल्पभुधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, पिके हातची गेल्याने बँकेचे 90000 रुपये फेडण्याची लागली होती चिंता

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांनी आखाडा बाळापूर येथील भारतीय स्टेट बँक शाखेकडून 90000 रुपयांचे पिककर्ज घेतले होते.

कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील अल्पभुधारक शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पिके हातची गेल्याने बँकेचे 90000 रुपयांची कर्ज कसे फेडावी या चिंतेमुळे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 29 रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील देवजी रावजी झुंगरे (50) यांना तीन एकर शेत आहे. या शेतावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरी पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. शेतात काम नसल्यावर रोजमजुरीची कामे देखील ते करतात.

यावर्षी त्यांनी आखाडा बाळापूर येथील भारतीय स्टेट बँक शाखेकडून 90000 रुपयांचे पिककर्ज घेतले होते. त्यानुसार त्यांनी शेतात तीन एकरवर सोयाबीनचे पिक घेतले होते. मात्र पेरणी पासून ते काढणी पर्यंत सतत पाऊस लागून राहिला. त्यामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकाला कोंबे फुटली. पिकाचे नुकसान झाल्याने लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

दरम्यान, गुरुवारी ता. 29 दुपारी ते शेतात गेले. शेजारी शेतकऱ्यांना बोलून ते बैलांना पाणी पाजण्यासाठी जात असल्याचे कारण सांगत शेतातील एका कोपऱ्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने खाली काढले. मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी रावजी देवजी झुंगरे यांच्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. उपनिरीक्षक मुपडे पुढील तपास करीत आहेत.