आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केज:पत्नीचे मणीमंगळसूत्र मोडून सोयाबीन पेरले, बियाणे उगवले नाही; शेतकऱ्याचा कृषी दुकानासमोर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न  

केज2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदूरघाट येथील घटना

पत्नीचे मंगळसूत्र मोडून शेतात सोयाबीनची पेरणी केली. मात्र बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीसाठी पैसे आणायचे कोठून ? असा प्रश्न पडलेल्या शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेत बियाणे खरेदी केलेल्या कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यातील नांदूरघाट येथे रविवारी सकाळी घडली. लालासाहेब दादाराव तांदळे ( रा. फकराबाद ता. वाशी जि. उस्मानाबाद ) असे या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील फकराबाद ( ता. वाशी ) हे केज तालुक्यातील नांदुरघाटपासून जवळच आहे. तर या गावातील नागरिक हे नांदूरघाट बाजारपेठेतून खरेदी करतात.  त्यामुळे फकराबाद येथील शेतकरी लालासाहेब दादाराव तांदळे यांनी नांदुरघाट येथील श्रेणी ऍग्रो एजन्सी या दुकानातून ग्रीन गोल्ड - ३३४४ व ३३५ या वाणाच्या सोयाबीन बियाण्याच्या दोन बॅग खरेदी करून शेतात पेरणी केली होती. या शेतकऱ्याची घराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तांदळे यांनी पत्नीचे मणीमंगळसूत्र मोडून पेरणीचा खर्च भागविला होता. मात्र शेतात पेरलेले सोयाबीन उगवून आले नाही. त्यामुळे केलेला खर्च वाया गेल्याने आता दुबार पेरणीसाठी पैसे आणायचे कोठून ? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता. त्यांनी बियाणे बोगस निघाल्याची तक्रार दुकानदाराकडे केली. मात्र दुकानदाराने बियाण्याच्या बॅगाचे पैसे अथवा इतर आर्थिक मदत दिली नाही. त्यामुळे हताश झालेल्या लालासाहेब तांदळे या शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेत रविवारी सकाळी या कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून जवळ असलेल्या नागरिकांनी त्यांना पेटवून घेऊ दिले नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे दुकानासमोर बघ्याची गर्दी जमा झाली होती. 

 दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याची समजूत काढली. त्यांनतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी ढापे यांनी शेतकऱ्याची भेट घेऊन चर्चा केली. पेरणीसाठी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या या शेतकऱ्यास पेरणीसाठी मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...