आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:बियाणे-खतांची जादा दराने विक्री; प्रति बॅग 190 ते 690 रुपये लूट; लिंकिंगचे खतही मारले जाते माथी

संतोष देशमुख | औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी विभागाचे दुर्लक्ष जाधववाडी बाजारपेठेसह दुकानांत शेतकऱ्यांची अडवणूक

मान्सूनचे आगमन झाल्याने पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ५० ते १०० िकमी अंतरावरून औरंगाबाद शहरातील कृषी सेवा केंद्रात खते, बी-बियाणे खरेदीसाठी गर्दी करत आहेत. मात्र, त्यांना हवे असलेल्या खतांसाठी प्रतिबॅग अतिरिक्त १९० ते ६९० रुपये मोजावे लागतात. वरून लिंकिंगचे खतही माथी मारले जात आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील आन्वी गावाचे शेतकरी परसराम पवार यांना तालुक्याच्या चिखली कृषी बाजारपेठेत डीएपी खत मिळाले नाही म्हणून त्यांनी ६० किमी अंतरावरील देऊळगाव मही येथील एका विक्रेत्याकडून १० बॅग डीएपी, त्यासोबत लिंकिंगची खते खरेदी केली. अशाच प्रकारे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी औरंगाबादेतील जाधववाडी, करमाड आदी कृषी बाजारपेठेत रात्री भाजीपाला विक्रीसाठी आणतात व जाताना बी-बियाणे, खते खरेदी करून नेतात. रासायनिक खतात शेतकऱ्यांची मागणी डीएपी, १०.२६.२६, १९.१९.१९ आदीला आहे. कपाशीत कबड्डी, संकेत, ०९४ ला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, जाधववाडी बाजारपेठेत ही खते व कबड्डी, संकेत बियाणे उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगतात. बोर्डावरही तसे लिहितात. ऑनमध्ये तरतूद करून दिली जाते. ग्रामीण कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून सर्रास विक्री होत आहे.

पर्यायी खते, बी-बियाणे घ्यावीत

शेतकऱ्यांनी एकाच खताची व बियाण्यांची मागणी करून लुटीला वाव देऊ नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले जात आहे. बाजारात सध्या डीएपी, १०.२६.२६ या खतांची मागणी जास्त असल्याने तुटवडा आहे. त्यामुळे पर्यायी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर वाढवून कमी खर्चात जास्त अन्नद्रव्य मिळवा, असे आवाहन केले जात आहे. एसएसपी ३ बॅग+युरिया २० किलो=८१.२० किलो अन्नद्रव्य खत १४७० रुपयांत मिळते. जे डीएपीच्या एका बॅगपेक्षा अधिक उपयुक्त असल्याचे कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांनी सांगितले.

लिंकिंगवर कोणाचेही नियंत्रण नाही

युरिया, २०.२०.०, सुपर फॉस्फेट, दाणेदार, २४.२४.०, ८.२१.२१, १५.१५.१५, पोटॅश खते तर कपाशी वाणात राजा, जादू, एटीएम, अतिश, धनदेव, जंगी, नवनीत, अजित ५५५, ११९९, ६५९, भक्ती ९१२१, ०२९, कबड्डी, संकेत आदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खत घ्या अथवा बियाणे त्यासोबत लिकिंगचे खते खरेदी करावीच लागतात. त्याशिवाय व्यवहारच होत नाही. यात उत्पादक, विक्रेते यांची साखळी असून आर्थिक हितसंबंधांमुळे कारवाई करणाऱ्यांचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे लिंकिंगवर कुणाचेच नियंत्रण राहिले नाही.

कबड्डीचे वाण निकृष्ट दर्जाचे : कबड्डीचे वाणही निकृष्ट दर्जाचे आले आहे. कृषी विभागाने गुप्त माहितीच्या आधारे धाडी टाकून बोगस बियाणे पकडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वाणाची मागणी करणे टाळावे. त्याऐवजी पर्यायी चांगले वाण निवडून खरेदी पावती जवळ बाळगावी, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत खते, बी-बियाणे खरेदीसाठी जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. अनेक दुकानांसमोरील बोर्डावर डीएपी, १०.२६.२६ खत नसल्याच्या सूचना लिहिलेल्या असतात.

बातम्या आणखी आहेत...