आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचा निषेध:हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या नावे पाठविले 1800 रुपयांचे धनादेश, संपूर्ण नुकसानीचा पीक विमा मिळाला नसल्याचा निषेध

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 टक्के नुकसान होऊनही विमा रक्कम कमी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांचे शंभर टक्के नुकसान होऊनही पिक विमा कंपनीकडून केवळ १८०० रुपयांचीच रक्कम दिल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह अन्य शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे १८०० रुपयांचे धनादेश पाठवून निषेध केला आहे. पिक विमा कंपनीने नियमाप्रमाणे पिक विमा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हिंगोल जिल्हयात यावर्षी १२४ टक्के पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, तुर, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता यावर्षी तब्बल ३ लाख शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचा पिकविमा काढला होता. त्यासाठी हेक्टरी ९०० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे भरणा केली होती. तर २०० रुपये ऑनलाईन विमा भरण्यासाठी लागले होते.

दरम्यान, १०० टक्के नुकसान झाल्यामुळे पिकविमा कंपनीने किमान ४० ते ४३ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देणे अपेक्षीत होते. मात्र डोंगरकडा परिसरातील शेतकऱ्यांना हेक्टरी १८०० रुपयांची पिकविम्याची मदत मिळाली आहे. याप्रकारामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, माधव सावके, दीपक सावके, सुरज सावके, देवबा सावके, कोंडजी सावके, भानुदास सावके, गंगाधर वाबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी ता. २४ पिकविमा कंपनीचे कार्यालय गाठून चार तास ठिय्या मांडला होता.

त्यानंतर डोंगरकडा येथील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे रावसाहेब अडकिणे व उध्दव गावंडे यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून पिकविमा कंपनीकडून मिळालेला १८०० रुपयांचा पिकविमा नाकारत त्याचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे पाठविला आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार पिकविमा मिळाला पाहिजे यासाठी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

१०० टक्के नुकसान होऊनही विमा रक्कम कमी : रावसाहेब अडकिणे, जिल्हाध्यक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना

जिल्ह्यात सोयाबीन व इतर पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी ७२ तासात नुकसानीची माहिती दिली नसल्याने त्यांना पिक विमा फेटाळण्यात आला. तर ज्यांनी माहिती दिली त्यांना मात्र १८०० रुपये देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना पिकविमा रकमेचा धनादेश पाठविला आहे.

बातम्या आणखी आहेत...