आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:प्रादेशिक साखर संचालक कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा; बळाचा वापर करून पोलिसांनी आंदोलन मोडून काढले

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • चर्चा निष्फळ, रस्ता रोको, आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी कारखाना सुरु करावा, गोठवण्यात आलेले शेतकऱ्यांचे बँक खाते सुरु करावे, थकीत सुमारे 11 कोटी रुपये परत मिळावे, आमदार प्रशांत बंब यांच्यासह इतरांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी मनसेचे संतोष जाधव यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत क्रांती चौक ते प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, ठिय्या व निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलक शेतकरी संतप्त झाले व कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाचा मोर्चा क्रांती चौकातील मुख्य रस्त्यावर जाऊन रस्ता रोकोत रुपांतर झाले. यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून हटवण्यास सुरुवात केली. यात आंदोलक व पोलिस यांच्या धरपकड झाली आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. यात प्रमुख नेत्यांनाही पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. दरम्यान, पोलिसांनी अनेकांना अटक करुन आंदोलन मोडून काढले.

गंगापूर सहकारी कारखाना भंगार म्हणून काही संचालक मंडळाने विक्रीस काढला आहे. याला आमदार प्रशांत बंब व सभासद शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. सोन्यासारखा कारखाना शेतकऱ्यांच्या परिश्रमातून उभा राहिला आहे. त्याची आम्ही माती होऊ देणार नाही. त्यामुळे कारखाना सुरू करावा, बेरोजगारांच्या हाताला काम द्यावे, खोटे गुन्हे दाखल करून सभासद शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत ते तातडीने सुरु करावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते तथा मनसे पदाधिकारी संतोष जाधव यांच्या नेतृत्वात 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून शेतकऱ्यांनी हातात उसाचे टिपरू, मागण्यांचे पोस्टर्स, जय जवान जय किसानचा नारा देत आपला मोर्चा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे वळवला. येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर अडीच तास ठिय्या आंदोलन केले. सोन्यासारखा साखर कारखाना भंगारात काढणाऱ्यांचे करायचे काय, खाली म्हणते वर पाय. जय जवान जय किसान. साखर कारखाना सभासदांचा... नाही कुणाच्या बापाचा, अनामत रक्कम मिळालीच पाहिजे, आमदार साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, अशा जोरदार घोषणा या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्या.

चर्चा निष्फळ, रस्ता रोको, आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

अधिकाऱ्यांना बाहेर बोलवा, नाही तर आम्हांला आत जाऊ द्या अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. त्यावर प्रादेशिक साखर कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. स्वामी यांनी दुपारी दीड वाजता आंदोलकांशी चर्चेसाठी खाली आले व आपल्या मागण्यांसंदर्भात पुणे येथे बैठक सुरू असून या बैठकीसाठी प्रादेशिक सहसंचालक गेलेले आहेत. बैठकीत जो निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला सोमवारी कळवू. तोपर्यंत आपले निवेदन आम्हाला द्या व आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन स्वामी यांनी शेतकरी व आंदोलकांना केले. आताच निर्णय घ्यावा म्हणत आंदोलकांनी क्रांती चौकामध्ये रास्ता रोको करण्यास सुरुवात केली होती. यामुळे जालना मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करून शेतकऱ्यांना हटवावे लागले. यात पोलिस शेतकरी यांच्या धरपडक झाली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा भाजप नेते रमेश गायकवाड, सदस्य मधुकर वालतुरे, आंदोलनाचे आयोजक संतोष जाधव यांच्यासह शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. एवढच नव्हे तर पोलिसांनी आंदोलकांच्या मागे धाव घेऊन अनेकाना अटक करत आंदोलनच मोडीत काढले.

आमदार प्रशांत बंबची क्रांती चौकात धाव, पोलिसांना खडसावले

आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांना मिळताच त्यांनी क्रांती चौकात धाव घेतली पोलिस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, संभाजी पवार यांच्याशी चर्चा करत लाठीमार का केला, परिस्तिथी तेवढी नसताना का केले, असा जाब विचारला. मस्तावलेले सरकार असून याचा आम्ही निषेध करतो, आंदोलन मोडीत काढल्यापेक्षा त्यांनी आंदोलन का केले? याचा तपास करून संबंधितांची चौकशी करा, असा सूचना त्यांनी पोलिसांना केल्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser