आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली तालुक्यातील सवड शिवारात दोनच दिवसांत रोहित्र जळाल्यानंतर दुसऱ्यावेळी मिळालेल्या रोहित्राची शुक्रवारी ता. १ गावातून ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी रोहित्र बसविण्यात आले आहे. रोहित्राची मिरवणूक पाहण्यासाठी गावकऱ्यांचीही गर्दी झाली होती. तर रोहित्र मिळाल्यामुळे पिके भिजविण्यासाठी सोय झाल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर होता.
हिंगोली तालुक्यातील सवड येथील शेतशिवारात बाळमुंजा भागात रोहित्र बसविण्यात आले होते. या रोहित्रावरून ११ शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना विज पुरवठा देण्यात आला होता. त्यातून या भागातील सुमारे ५५ एकर शेत जमीनीवरील पिकांना पाणी देणे शक्य झाले होते. यामध्ये संत्रा, मोसंबीच्या बागांसह हळदीच्या पिकांचा समावेश आहे.
दरम्यान, मागील आठ दिवसांपुर्वी रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे संत्रा मोसंबीच्या बागांसह हळदीचे पिक तसेच हरभरा व गहू पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी विज कंपनीचे कार्यालय गाठून रोहित्र देण्याची मागणी केली. त्यावेळी ११ शेतकऱ्यांनी २२००० रुपयांचे देयक भरल्यानंतर डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना रोहित्र देण्यात आले होते. मात्र सदर रोहित्र बसविल्यानंतर अवघ्या दोन दिवसात नादुरुस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नादुरुस्त रोहित्र विज कंपनीकडे भरणा करून ता. ३१ डिसेंबर रोजी दुसरे रोहित्र मिळविले.
लिंबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विज कंपनीच्या कार्यालयातून शुक्रवारी १ जानेवारीला नवीन रोहित्र गावात नेण्यात आले. सदर रोहित्र ट्रॅक्टरद्वारे गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी गावाच्या प्रवेशद्वारापासून ढोलताशांच्या गजरात रोहित्र शेतशिवारापर्यंत नेले. त्या ठिकाणी रात्री रोहित्र बसविण्यात आले आहे. यावेळी शेतकरी मनोज थोरात, रघुनाथ थोरात, गोविंद जावळे, सुग्राव पडोळे, मुंजाजी पडोळे, बापूराव जोजार, हनुमान पडोळे, सुभाष थोरात, श्रीराम रत्नपारखी, सुधाकर रत्नपारखी, मालजी थोरात, नामदेव पडोळे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. गावात रोहित्राची मिरवणुक पाहण्यासाठी गावकऱ्यांचीही गर्दी झाली होती. आता हे रोहित्र तरी चांगले सुरु राहिल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.