आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुगे विकून वडील, मुलगी व मुलीचा मामा एका दुचाकीवरून खुलताबादवरून औरंगाबादच्या दिशेने येत होते. मात्र, दौलताबाद घाटात सुसाट वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला उडवले. यात तिघेही दूरवर फेकले गेले आणि २३ वर्षीय मोनिका गणेश रेनवाला हिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलीचे वडील ज्ञानेश्वर दामोदर परदेशी (४०) यांचादेखील रुग्णालयात मृत्यू झाला. मोनिकाचे मामा बद्री साईदास जाधव (४५, रा. पडेगाव) यांची प्रकृती गंभीर आहे.
मोनिका तिचा पती व मुलीसह जाधववाडीत राहतात. तिचे वडील ज्ञानेश्वर हेदेखील अनेक दिवसांपासून जाधववाडीतच राहत होते. फुगे विकून ते सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. रविवारी सकाळी माेनिका, ज्ञानेश्वर व बद्री जाधव खुलताबाद परिसरात एकाच दुचाकीवर (एमएच २० डीएक्स ७०४०) गेले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते अाैरंगाबादकडे परतत हाेतेे. या वेळी दौलताबाद घाटातील इको बटालियन कार्यालयाच्या पुढे त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने उडवले. वाहनाचा वेग अधिक असल्याने धडक बसताच दुचाकीवरील तिघेही उंच उडून लांब फेकले गेेले. स्थानिक व इतर वाहनचालकांनी धाव घेईपर्यंत मोनिकाचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती कळताच निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे व इतर कर्मचारी, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातानंतर वाहनचालक पसार, रुग्णालयात नेण्यास विलंब
अपघातानंतर वाहनचालकाने जखमींचा विचारही न करता पलायन केले. स्थानिक, पोलिसांनी रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रुग्णवाहिका पोहोचण्यास जवळपास ५० मिनिटे उशीर झाला. रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर तिघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बद्री व ज्ञानेश्वर दोघांवर उपचार सुरू केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने ज्ञानेश्वर यांचा देखील संध्याकाळी मृत्यू झाला. बद्री यांची प्रकृती मात्र रात्री उशिरापर्यंत चिंताजनक होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.