आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:मरणाच्या भीतीने शहर सोडले, आता गावात जगण्याची चिंता

अंबड (नितीन पोटलाशेरू)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाल्याच्या काठावर आयुष्य काढलं, मुंबईची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो

मुलांच्या शिक्षणाचा विचार करून मुंबईत नाल्याच्या काठावर तात्पुरत्या घरात दिवस काढले. आता तिथली आठवण काढली तरी अंगावर काटा उभा राहतो. मरणाच्या भीतीने मुंबई सोडली आणि गाव जव‌ळ केलं. आता इथे जगण्याचा नवा संघर्ष सुरू झाला. एका कुटुंबाची ही कैफियत...

सकाळी नऊची वेळ. गावातल्या हेमाडपंती महादेव मंदिराबाहेर मळकट शर्ट, जीर्ण झालेली व एका बाजूचा अंगठा तुटलेली चप्पल घातलेला पस्तिशीतील परमेश्वर जाधव शेतातल्या कामाच्या मोबादल्यावरून वाटाघाटी करत होता. मोठ्या शहरातील नाक्यांवर दिसणारे हे चित्र आता गावच्या पारावर पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतर अशा असंख्य तरुण, मजुरांनी मोठे शहर सोडून गाव जवळ केले. रोजगाराच्या अत्यल्प संधी अन् कौशल्याचा अभाव असल्यामुळे जगण्यासाठीचा संघर्ष आणखी मोठा असेल याची जाणीव परमेश्वरच्या आवाजातील कंपनातून आणि दाटून आलेल्या कंठातून होत होती. परमेश्वर हा जालना जिल्ह्यात अंबडपासून २० किमी अंतरावर असलेल्या निपाणी पिंपळगावचा रहिवासी. दुष्काळामुळे हाताला काम मिळेना म्हणून पत्नी कौशल्या, मुलगा व मुलीला घेऊन त्याने २०११ मध्ये गाव सोडले होते.

आता मुंबईला दुरूनच ‘राम राम..’ : परमेश्वरची पत्नी कौशल्या म्हणते, ‘मुंबईची आठवण झाली की, अंगावर काटा उभा राहतो. नाल्याच्या काठावर तात्पुरत्या घरात आयुष्य काढणं नरकयातना देणारं होतं. पण मुलांच्या शिक्षणासाठी ते पण स्वीकारलं. धीर देणारं तिथं कुणी असतं तर कदाचित आम्ही आलोही नसतो. येथे किमान जिवाला जीव देणारी लोकं तरी आहेत. मुंबई पालिकेच्या शाळेत मुलगा आठवी, तर मुलगी सहावीत शिकायचे. आता टीसी आणण्यासाठीही मुंबईत पाय ठेवायची इच्छा नाही.’

आठवड्यात चारच दिवस काम

परमेश्वर यांच्या कुटुंबात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असे पाच लोक. भूमिहीन आणि केवळ तिसरीपर्यंत शिक्षण असल्याने मुंबईला गेले. पण कोरोनाच्या भीतीने गावात आले. कौशल्याचा अभाव असल्याने शेतीतील मजुरीशिवाय दुसरं कोणतही काम करता येत नसल्याने मोठी अडचण झाली. सध्या आठवड्यातील तीन ते चार दिवस काम मिळते. यात दिवसाला २०० ते २५० रुपये मजुरी मिळते. रेशन कार्ड नाही त्यामुळे धान्य मिळण्याचा प्रश्नच नाही. मग आहे त्याच कमाईवर दिवस काढावे लागत आहेत. दुसरीकडे पत्नी कौशल्याला सहजासहजी काम दिले जात नाही. काम मिळाले तरी मजुरी दीडशेपेक्षा अधिक दिली जात नाही. अशा स्थितीत कुटुंबातील सर्वांचे कसे भागणार, असा उद्विग्न सवाल परमेश्वर यांनी विचारला.

महिन्यातल्या कमाईतील मोठा हिस्सा दर महिन्याला पाडलेले घर उभारण्यात जायचा

कौशल्याने सांगितले, मालाड भागात नाल्याच्या शेजारी पत्रे ठोकून निवारा तयार केला. महिन्यात एकदा तरी अतिक्रमणात घर पाडले जायचे. ते उभारण्यासाठी महिनाभराच्या दहा हजारांच्या कमाईतील तीन हजारांची पदरमोड व्हायची. अशा स्थितीत नऊ वर्षे काढली. पण १५ मार्चच्या सुमारास मुंबईत कोरोनाची प्रचंड भीती पसरली. सर्व बांधकामे आधीच बंद झाली होती. त्याच क्षणी निर्णय घेतला. २० मार्चला सकाळी पैशाची कशीबशी जमवाजमव करून तपोवन पकडली. सर्वजण गावी पोहोचलो. १४ दिवस गावच्या वेशीवर क्वॉरंटाइन होऊन काढले. मग गावात भावाच्या घरात निवारा मिळाला. रोजगाराचा प्रश्न मात्र कायम होता. गावातील अनेकांनी मदत केली. शिवाय आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध केल्याचे या गावातील डॉ. योगेश ढेंबरे यांनी सांगितले.

0