आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:कोरोनापेक्षा मजूर पळण्याची भीती, आधीच उठवली स्थगिती - लाॅकडाऊन संपण्याआधीच जलसंपदाचा कामाचा धडाका

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 30 मार्च पासून कामे सुरू करण्याचे परिपत्रक
  • साईटवर पाळणार सामाजिक विलगीकरणाचा नियम

काेरोनाच्या संसर्गामुळे देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन केला असला तरी जलसंपदा खात्याला तो मान्य नाही. यामुळेच लाॅकडाऊन उठण्याचा १५ दिवस आधीच जलसंपदाने सिंचन प्रकल्पांच्या कामाला सुरूवात केली आहे. कामे नसली तर मजूर पळून जाण्याची भीती अाहे. शिवाय ही कामे दुर्गम भागातली असल्याने तेथील मजूरांचे कॅम्प क्वारेंटाईन सदृश असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. यामुळे स्थगिती उठवल्याचे खात्याचे म्हणने आहे. कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक विलगीकरण हा एकमेव उपाय सांगीतला जात आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या नंतर जलसंपदा विभागाने राज्यभरातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना स्थगिती दिली. कामावर असणारे कर्मचारी, मजूर यांच्यामुळे रोगाचा प्रसार होवू नये हा यामागील हेतू होता. मात्र, लॉकडाऊन संपण्याच्या १५ दिवसांपूर्वीच म्हणजे ३० मार्च रोजी ही स्थगिती उठविण्यात आल्याचे परिपत्रक या खात्याचे उपसचिव ज्ञा. आ. बागडे यांनी जारी केले आहे. यामुळे लॉकडाऊनच्या मूळ हेतूबाबत शंका निर्माण झाली आहे.

ही तर महत्वाची कामे

सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीसाठा व सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याने ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. ही कामे शहरे व खेड्यांपासून दुर्गम भागात असल्याने साइटवरील मजुरांच्या कॅम्पचा आसपासच्या लोकवस्तीशी संपर्क येत नाही. यामुळे हे कॅम्प क्वारंटाइन सदृश आहेत. शिवाय प्रकल्पांची कामे बंद पडल्यास मजुरांचे स्थलांतर होण्याची शक्यता असल्याने स्थगिती उठविण्यात येत असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

कॅम्प सोडून जाण्यास मनाई

प्रकल्पावरील मजुरांना कॅम्प सोडून जाण्यास मनाई करावी. कार्यरत मजुरांकडूनच कामे करून घ्यावीत, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शिवाय साइटवर साामजिक विलगीकरणाचा नियम पाळावा. या नियमातच कामे होत असल्याची खात्री कंत्राटदार व संबंधित अभियंत्यांनी करावी. तसेच, मजुरांना साइटवर अन्नधान्य, किराणा माल व भाजीपाला उपलब्ध करण्याची जबाबदारी कंत्राटदाराने उचलावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

दुर्गम भागातील कामेच सुरू

सिंचन प्रकल्पाची कामे महत्त्वाची आहेत. यामुळे स्थगिती उठवण्यात आली आहे. पण, सरसकट कामे सुरू होणार नाहीत. फक्त दुर्गम भागातील कामेच सुरू राहतील. कामे सुरू झाल्यामुळे येथील मजुरांचे स्थलांतर थांबेल. मजुरांची निवास व भोजना सुविधाही उपलब्ध केली जाईल.
- एन. व्ही. शिंदे, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ

बातम्या आणखी आहेत...