आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔद्योगिक परिसरातील एच-६२ सेक्टरमध्ये एसपी इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीचे सुरक्षा रक्षक काशीनाथ इंगोले व कामगार नितीन कुमार यांना दमदाटी करून कंपनीतील तब्बल ७ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १४ जून रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी कंपनी मालक संदीप भास्करराव पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी चोरीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी कंपनीमधील लोडिंग रिक्षाचा वापर केला.
या कंपनीत तांब्याच्या वस्तूपासून इलेक्ट्रोप्लेटिंगला लागणारे जिक्सफिक्चर बनवण्याचे काम केले जाते. कुमार कंपनी समोरील खोलीत राहतो तर रात्री इंगोले सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दरम्यान, १३ जून रोजी रात्री काम आटोपल्यावर नेहमीप्रमाणे कंपनीचे शटर बंद करून इंगोलेकडे चावी देऊन पाटील घरी गेले. घटनेच्या दिवशी पहाटे तोंडाला रुमाल बांधून चार चोरटे कंपनीत घुसले. या वेळी इंगोलेने त्यांची चौकशी केली असता, इंगोले व कामगार कुमार यांना धारदार शास्त्राचा धाक दाखवून एका खोलीत डांबून ठेवले.
त्यानंतर त्यांच्यावर दाेघे पाळत ठेवण्यासाठी तेथे उभे राहिले. उर्वरित दोघांनी कंपनीच्या शटरची चावी हस्तगत करून प्रवेश करत तांब्याच्या धातूच्या पट्ट्या, चौकोनी बार, बारीक चुरा, पाइप, धातूचे तयार मटेरियल व काही नवीन माल लोडिंग रिक्षात भरला. एकूण रिक्षासह ७ लाख ८५ हजारांचा ऐवज पळवल्याची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा शोध सुरू सदरील कंपनीत १५ सीसीटीव्ही आहेत. यात चोरट्यांचे सर्व चित्रण झाले होते. मात्र, चोरट्यांनी जाण्यापूर्वी थेट डीव्हीआर बॉक्स तोडून तो सोबत घेऊन गेले. अंदाजे २५ ते ३० वर्षीय चोरटे परिसरातील इतर सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.