आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमखास मैदानावर ‘आयजे फेस्ट’निमित्त १० नोव्हेंबरपासून खानाखजाना फूड फेस्टिव्हलला सुरुवात झाली. येथे ७५ पेक्षा जास्त विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. साऊथ इंडियन, चायनीज, मोगलाई, कबाबसह प्युअर व्हेज बेकरी आयटम, केक व पेस्ट्रीवर ताव मारता येईल. याच ठिकाणी १०० पेक्षा जास्त प्रकारचे अत्तर विक्रीला आले आहेत.
फूड फेस्टिव्हलमध्ये शाकाहारी, मांसाहारी, चायनीज खाद्यपदार्थ, केक, पेस्ट्री, पापड, मसाला दुधाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये शेकडाे प्रकारचे अत्तर, शंभर प्रकारचे परफ्यूम, ५० प्रकारचे डिओ विक्रीस ठेवले आहेत. दुबई येथील मुष्क रिजाला हे ६०० रुपये तोळा असलेल्या अत्तराला विशेष पसंती मिळत आहे.
मुखलद हे दोन हजार रुपयांत एक तोळा किमतीचे उदही विक्रीस आले आहे. मगई, फायर, मलाई, कुल्फी, चॉकलेट, बनारस यासारखे पान तर मसाला दूध, नागेली पापड, हलीम, चायनीज पदार्थांना खवय्यांची पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे दर आहेत. पहिल्या दिवशी सर्वच स्टॉलवर गर्दी पाहायला मिळाली. केकच्या विविध प्रकारामध्ये केक सिकल्स, पॉप सिकल्स, विविध प्रकारचे चॉकलेट, जे महिलांनी घरी बनवले आहेत ते पहिल्यांदाच विक्रीसाठी आलेले आहेत.
शाकाहारी केक, बेकरी पदार्थ
शुद्ध शाकाहारी केक व बेकरी पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात नावाजलेले चीज केक, मुज केक खाद्यप्रेमीच्या पसंतीला उतरत आहेत. येथे पन्नास पेक्षा जास्त प्रकारचे बेकरी पदार्थ आहेत.
विक्रेते हैदराबाद, अलाहाबादहून येणार
पहिला दिवस असल्याने स्थानिक विक्रेत्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले हाेते. ११ नोव्हेंबर रोजी अलाहाबाद, हैदराबाद येथील खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्याबाहेरील विविध खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.