आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेलोशिप:पाच वर्षांत 645 जणांना फेलोशिप, अनुसूचित जातीच्या सर्वाधिक 225 विद्यार्थ्यांना लाभ

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: शेखर मगर
  • कॉपी लिंक
  • मराठा समाजातील 163 विद्यार्थ्यांना सारथीची, तर बार्टीची 43 जणांना मदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन करणारे ६४५ विद्यार्थी फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत. पाच वर्षांतील ही आकडेवारी आहे. सर्वाधिक संशोधन छात्रवृत्ती २२५ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. राज्यातही सर्वाधिक संशोधकांना छात्रवृत्ती मिळवून देणारे हेच विद्यापीठ असून यामुळे नावलौकिक वाढल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध विद्याशाखेत संशोधन करताना विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती अर्थात फेलोशिप देण्यात येते. सरासरी ३० ते ३५ हजार रुपये दरमहा संशोधक विद्यार्थ्यांना मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (२०१५-१६ ते २०२०-२१) ६४५ संशोधकांना फेलोशिप मिळाली. यात यूजीसी तर्फे दिली जाणारी नॅशनल फेलोशिप फॉर हायर एज्युकेशनचे लाभार्थी सर्वाधिक आहेत.

पूर्वी या फेलोशिपला राजीव गांधी नॅशनल रिसर्च फेलोशिप असे संबोधले जात होते. पण आता केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यामुळे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे दिलेले नाव काढून टाकण्यात आले. आता या फेलोशिपला नॅशनल फेलोशिप फॉर हायर एज्युकेशन असे म्हटले जाते. एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून- ३१ जण पात्र झाले आहेत. तर एस.सी. अर्थात अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून २२५ विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळाली.

मौलाना आझाद फेलोशिप अल्पसंख्याक प्रवर्ग- ७७, ओबीसी फेलोशिप-२ नेट जेआरएफ- ६१, दिव्यांगांसाठी फेलोशिप- १४, डॉ. एस. आर. राधाकृष्णन फेलोशिप-२, स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती- २, छत्रपती शाहू महाराज इन्स्टिट्यूट सारथी- १६३ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) - ४३ अशा प्रकारे फेलोशिप प्राप्त झाली. बीएसआर फेलोशिप सायन्सेस, बीएसआर फेलोशिप फॅकल्टी यामध्ये मात्र एकालाही प्राप्त झाली नाही.

दरम्यान, सारथी तर्फे देण्यात येणाऱ्या फेलोशिपसाठी राज्यातून २०७ जणांनी मुलाखती दिल्या. यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शंभरहून अधिक जणांचा समावेश आहे. दरम्यान, आयसीएचआर व आयसीएसएसआरकडून पाच वर्षांपासून एकाही विद्यार्थ्याला फेलोशिप देण्यात आली नाही.

संशोधकांनी नावलौकिक वाढवला
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व मेहनतीची तयारी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते उत्तम संशोधन करू शकतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. फेलोशिप घेणारे सर्वाधिक संशोधक आपल्या विद्यापीठातील आहेत, ही आनंदाची बाब आहे. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...