आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात नियो मेट्राे रेल्वे आणि शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाणपुलासाठी ३१ ऑक्टोबरला महामेट्रोकडून पहिले सादरीकरण करण्यात आले होते. या बैठकीत काही बदल करण्याच्या सूचना महामेट्रोला करण्यात आल्या हाेत्या. त्यासाठी मनपा, पोलिस, पुरातत्त्व विभाग, छावणीसह संबंधित विभागांशी चर्चा करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार ६ जानेवारी रोजी महामेट्रोचे महाव्यवस्थापक विकास नगलूकर यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे लवकरच नियो मेट्रोचा अंतिम आराखडा आणि डीपीआर मनपासमोर सादर करण्यात येईल.
वर्षभरापासून शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेबाबत चर्चा सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमाेर पहिला आराखडा सादर करण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पासाठी सहा हजार २७८ कोटी रुपयांचा निधी लागेल, असा प्राथमिक अंदाज महामेट्रोकडून काढण्यात आला होता. पुढील ३० वर्षात शहराची गरज लक्षात घेता हे नियोजन सुरू आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देईल. २०५२ सालची अपेक्षित लोकसंख्या आणि त्या वेळची वाहतूक विचारात घेण्यात आलेली आहे. या प्रकल्पासाठी ६,२७८ कोटी रुपयांचा निधी लागेल, असा अंदाज आहे.
अशी असणार नियो मेट्रो : नियो मेट्रो ही मेट्रो रेल्वे आणि बस यांचे हायब्रकड व्हर्जन आहे. ती १८ मीटर आणि २४ मीटर या दोन आकारांत असते. ती ११० ते १७० आसन क्षमतेची असेल. मेट्रो नियोसाठी रुळांची गरज नाही. तिला टायर असल्याने ती रस्त्यावरूनच धावते. यासाठी एका पिलरवर असणार पूल उभा करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात शेंद्रा ते रेल्वेस्टेशन, हर्सूल ते रेल्वेस्टेशन असा मार्ग ठरवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शेंद्रा ते वाळूज आणि रेल्वेस्टेशन ते मुकुंदवाडी व्हाया हर्सूल टी पॉइंट या दोन मार्गांवर नियो मेट्रो प्रस्तावित आहे. या मार्गांवर एकूण २२ मेट्रो स्टेशन्स असतील. शेंद्रा ते वाळूज हा एकूण २८ किमीचा मार्ग प्रस्तावित आहे.
वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या बैठकीत होईल अंतिम निर्णय
मनपा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसमाेर अंतिम डीपीआर सादर झाल्यानंतर उड्डाणपुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोरही हा डीपीआर सादर होणार आहे. एक किलोमीटर उड्डाणपुलासाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रोसाठी शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर सादरीकरण केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.