आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:तरुणीस कारखाली चिरडणाऱ्या पीएसआयसंतोष पाटेवर अखेर २ वर्षांनी गुन्हा दाखल; खंडपीठाचे परखड मत : गंभीर गुन्ह्यांबाबत मूकदर्शक बनणार नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन तरुणी आकेफा मेहरीन हिच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतल्यानंतर अखेर दोन वर्षांनंतर पोलिस उपनिरीक्षक संतोष पाटेवर गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात योग्य तपास न करता आरोपीस पाठीशी घालणारे तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. के. खटानेंवर पोलिस आयुक्तांनी तत्काळ विभागीय चौकशी करून सक्त कारवाई करावी, असे आदेश न्या. रवींद्र घुगे आणि बी. यू. देबडवार यांनी दिले. इतकेच नव्हे तर ‘अशा प्रकरणात न्यायालये मूकदर्शक बनून कानाडोळा करू शकत नाहीत. पोलिस अधिकाऱ्याच्या अशा कृत्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आमच्या कर्तव्यात अपयशी ठरू,’ असे मतही खंडपीठाने नोंदवले.

अकरावी विज्ञान शाखेत शिकणारी आकेफा २२ एप्रिल २०१९ रोजी दुपारी दुचाकीने (एमएच २० सीई ९२८८) आरेफ कॉलनीतून भडकल गेटकडे जात होती. त्या वेळी जामा मशिदीकडून भरधाव कारने येणाऱ्या सिटी चौक ठाण्याचा पोलिस उपनिरीक्षक संतोष पाटेने टाऊनहॉल उड्डाणपुलावर आकेफाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात आकेफा जखमी होऊन पाटेच्या कारसमोर पडली. मात्र माेठा जमाव जमल्याने घाबरलेल्या पाटेने जखमी अवस्थेत पडलेल्या अाकेफाच्या अंगावरुन बेदरकारपणे तशीच कार दामटली व पळ काढला. यात आकेफाच्या मेंदूस गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान २४ एप्रिल २०१९ रोजी तिचा मृत्यू झाला. तिचे वडील मोहंमद जहीर यांनी दोषींवर कारवाईसाठी अॅड. सईद एस. शेख यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली होती. त्यांना अॅड. सय्यद जाहीद अली यांनी सहकार्य केले. तर, शासनाच्या वतीने सरकारी वकील डी. आर. काळे आणि सहायक सरकारी वकील के. एस. पाटील यांनी काम पाहिले.

खंडपीठात चौकशी अहवाल सादर : ५ जानेवारी २०२१ रोजी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी खंडपीठात चौकशी अहवाल सादर केला. यात तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. के. खटाने यांनी तपासात चुका केल्याचे मान्य केले. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचेही सांगितले. खटाने यांच्याकडून तपास काढून सहायक पोलिस आयुक्त हनुमंत भापकरांकडे सोपवल्याने वेळ मागितला हाेता, ताे न्यायालयाने दिला. अाराेपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाेलिसांवर खंडपीठाने ताशेरे अाेढले. ‘घटनेनंतर आरोपी उपनिरीक्षकाची त्या ठाण्यातून बदली केली असती तर आम्ही त्यांचे कौतुक केले असते. मात्र, ऑक्टोबर २०२० पर्यंत आरोपी पाटे भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सापळ्यात अडकेपर्यंत त्याच ठाण्यात कार्यरत होता.

त्यामुळे तत्कालिन तपासिक अधिकाऱ्याची एक वर्षाची वेतनवाढ अायुक्तांनी राेखली असली तरी त्यामुळे त्याने केलेल्या गंभीर चुकांची भरपाई होणार नाही. अशा प्रकरणात न्यायालये मूकदर्शक बनून शकत नाहीत. पोलिस अधिकाऱ्याच्या अशा कृत्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आमच्या कर्तव्यात अपयशी ठरू’, असे मत खंडपीठाने नोंदवले. म्हणून पोलिस आयुक्तांनी तत्कालिन तपासिक अधिकाऱ्यावर (एस. के. खटाने) कारवाई करावी, ज्यामुळे सामान्यांना पोलिस यंत्रणेवरील विश्वास कायम राहील,’ असे निर्देशही दिले.

कनिष्ठ न्यायालयास योग्य कारवाईची मुभा : याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. शेख यांनी आरोपी संतोष पाटेवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तर पुरावे नष्ट करून या गुन्ह्यात त्यास साहाय्य करणारे सहायक पोलिस निरीक्षक एस. के. खटाने आणि अपघात घडल्यावर अपघातस्थळी येऊन साक्षीदारांना धमकावणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षक अनिता बागूल यांना सहआरोपी करण्याची विनंती केली. तेव्हा उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून नियमांनुसार कनिष्ठ न्यायालयास योग्य ती कारवाई करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे.

आयुक्तांना लक्ष घालण्याचे आदेश
खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि एम. जी. सेवलीकर यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून घटनास्थळाचा पंचनामा करावा तसेच प्रत्यक्ष साक्षीदारांची चौकशी करावी, असे निर्देश दिले हाेते. तसेच गरज पडल्यास तपास अधिकारी बदलावा, असे सांगताना क्लीन चिट देणाऱ्या तत्कालीन तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी दिली होती आरोपीला क्लीन चिट
याप्रकरणी सुरुवातीला सिटी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसअाय पाटे याची अपघातग्रस्त कारही जप्त करण्यात अाली. मात्र तपासाअंती त्याला क्लीन चिट मिळाली. पाटे याच सिटी चाैक पाेलिस ठाण्यात कार्यरत असल्याने त्याला जाणीवपूर्वक क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोपही मृत तरुणीच्या वडिलांनी याचिकेत केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...