आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदाराला 10 दिवसांत काम पूर्ण करण्याच्या सूचना:अखेर मनपा प्रशासकांनी मकई गेट रस्त्याच्या कंत्राटदाराचे टोचले कान

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात जी-२० चे पथक येणार असल्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत मकई गेट ते टाऊन हॉलपर्यंत रस्ता खोदून टाकला, ड्रेनेज चेंबर फोडले. पाण्याची पाइपलाइन खोदून टाकली. तीन महिने उलटले तरी काम पूर्ण होईना. उलट रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे चेंबर रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक उंचीचे बांधले. त्यामुळे एकीकडे विद्यापीठात ये-जा करणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह बीबी का मकबऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठा वळसा घेऊन ये-जा करावी लागत होती. तसेच किमान सात ते आठ वसाहतीच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ९ एप्रिलला “दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित करताच मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी १० एप्रिल रोजी मनपा व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन पाहणी करत कंत्राटदाराला धारेवर धरत रस्त्यावरील ड्रेनेजचे काम दहा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मकई गेट ते टाऊन हॉलपर्यंतचा रस्ता जी-२० चे पथक येणार म्हणून स्मार्ट सिटीने तयार करण्यास सुरुवात केली होती. यामुळे रस्त्याची समस्या सुटेल, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना हाेती. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून ड्रेनेज तर कधी पाइपलाइनचे काम, असे कारण दाखवत काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठकडे ये-जा करणारे प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह बेगमपुरा, आसेफिया कॉलनी, पहाडसिंगपुरा कॉलनीतील रहिवाशांना माेठा वळसा घेत ये-जा करावी लागत आहे. ड्रेनेजचे पाइप फोडल्याने नागरिकांना त्रास होतो.

प्रशासक येताच ड्रेनेज स्वच्छतेसाठी आली गाडी मनपा प्रशासकांनी रस्त्याची पाहणी करत असताना अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरायला सुरुवात केली. यादरम्यान, आसेफिया कॉलनी वळणावरील ड्रेनेजच्या चेंबरची स्वच्छता करण्यासाठी जेटिंग मशीन बाेलावण्यात आली व त्वरित तेथील स्वच्छता केली.

काय दिल्या सूचना आगामी दहा दिवसांत मकई गेट ते आसेफिया कॉलनी वळणापर्यंतचे ड्रेनेजचे काम स्मार्ट सिटीने, तर आसेफिया वळण ते टाऊन हॉलपर्यंतचे ड्रेनेजचे काम मनपा प्रशासनाने पूर्ण करावे. तसेच जो ड्रेनेजचा चेंबर रस्त्याच्या मधोमध उंच आहे, तो रस्त्याच्या लेव्हलपर्यंत करावा.