आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रिय मित्र-मैत्रिणींनो,
मला मराठवाड्यातील एका खेड्यातील गृहस्थांचा फोन आला. त्यांचा किशोरवयीन मुलगा ‘हाताबाहेर गेल्यामुळे’ ते पार हतबल झाले होते. मुलाची आई लहानपणीच वारलेली. आईविना मुलगा, म्हणून जरा जास्तच लाडात वाढलेला. त्याने १२ वीची परीक्षा दिली. आधी अभ्यासात थोडंफार तरी लक्ष होतं. पण कोरोनाकाळात दोन गोष्टी झाल्या – शाळाकॉलेजला सुट्टी आणि हातात स्मार्टफोन. बाबा अजूनही जुना हजार रुपयांचा नोकिया वापरत असले तरी त्यांनी मुलाला ‘अभ्यासाला’ चांगला अठरा हजारांचा फोन घेऊन दिला. पण त्या फोनने त्याला मायानगरीची जी सफर घडवली, त्यामुळे तो अभ्यास करणं पार विसरून गेला. घरी फक्त जेवायला, बाकी पूर्णवेळ मित्रांसोबत ‘ज्ञानप्राप्ती’. अर्धकच्च्या वयात भावना चाळवल्याने त्याचं आता अभ्यासातच नाही, तर इतर कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. आता कुठे अठरा वर्षे पूर्ण होतील आणि तो वडिलांना ‘माझं लवकरात लवकर लग्न करून द्या’, म्हणून सांगतो आहे. त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला, तर पठ्ठ्या तीन दिवस उपाशी राहिला. ‘मी मोबाइलशिवाय जगू शकणार नाही’ असं म्हणाला. (एखाद्या मुलीबद्दल तो असं म्हणाला तर समजण्यासारखं होतं.) शेवटी घरच्यांनी हार मानली. आपण आणखी ताणलं तर पोरगा जिवाचं बरंवाईट करून घेईल ही भीती. त्याच्या एका मित्राने तर नात्यातल्या एका बाईच्या अंगावर हात टाकला. ‘ह्या सगळ्या मुलांचं काय करायचं?’, हा त्याच्या वडिलांचं प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, असं मला वाटतं. कारण नाशिकला राहणाऱ्या एका उच्चमध्यमवर्गीय मुलीच्या आईचाही असाच प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला वेगवेगळी उत्तरं आहेत. नाशिकच्या मुलीसाठी शालेय काउन्सेलर किंवा अन्य व्यावसायिक काउन्सेलर यांची मदत घेण्याचा पर्याय खुला आहे. जळगावला राहून विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालवणाऱ्या एका सरांनी तर आपल्या क्लासमध्ये येणाऱ्या मुला-मुलींचे मानसिक प्रश्न सोडवण्याचा विडाच उचलला आहे. माझे विद्यार्थी-विद्यार्थिनी माझ्याशी मित्रासारखे वागतात व आपले मन मोकळे करतात, असे ते अभिमानाने सांगतात. जिथे जिथे असे शिक्षक आहेत, तिथे आशेला नक्कीच जागा आहे. पण त्या शिक्षकांसमोरही पेच आहे. मुलांच्या मनातील लैंगिकताविषयक भ्रम ते दूर करतात, त्यांना वैज्ञानिक माहिती पुरवतात. आईवडिलांनी करायला हवं ते काम ते करतात. पण त्या बदल्यात अनेक पालक त्यांना ‘तुम्ही मुलांना अभ्यासक्रमात काय दिलं आहे ते शिकवा, फालतू गप्पा करणं, त्यांच्याशी दोस्ती करणं योग्य नाही, अंतर ठेवून वागा’ असा इशाराही देतात. आपल्या समाजातील दांभिकतेचा आणखी पुरावा कुठला हवा?
लहान मुलं मोठ्यांच्या उपदेशातून नव्हे, तर त्यांच्या आचरणातून शिकतात. पालक दिवसभर फेसबुक व व्हॉट्सअॅपवर पडीक असतील तर त्यांना ‘मोबाइलमधून डोकं वर काढ’ हे कोणत्या तोंडाने सांगणार? विविध स्त्री-पुरुषांशी आपल्या घरातील व्यक्तींची यथोचित आदर-प्रेम-स्नेहाची नाती असतील, तरच त्यांना नातेसंबंधांचं महत्त्व कळेल. नाही तर आपली आई-बहीण सोडून जगातील सगळ्या स्त्रिया क्लिपमध्ये दाखवतात तशा ‘भाभी’ किंवा ‘आंटी’ असतात, असेच मुलग्यांना वाटेल. आपल्या घरात, आसपास मुलींच्या बुद्धिमत्तेची, गुणांची, कौशल्यांची चर्चा होत नसेल; त्यांच्या दिसण्याचीच चर्चा घरातले स्त्री-पुरुष करत असतील, तर मुलींची महत्त्वाकांक्षा आपण सुंदर बाहुली व्हावे व पुरुषांना भुरळ पाडावी, एवढीच राहील. लैंगिक अपराध करणारे किशोरवयीन मुलगे आणि अशा कोणत्याही अपराधांच्या बळी ठरणाऱ्या किशोरवयीन मुली, हे दोघेही ह्या व्यवस्थेचे बळी आहेत. त्या दोघांनाही तारुण्याचा, यौवनातील ऊर्जेचा, नातेसंबंधांचा अर्थ समजलेला नाही. तो समजावणे ही समाजातील सर्वांची, प्रामुख्याने घरातील स्त्री-पुरुषांची व शिक्षकांची जबाबदारी आहे. केस ‘हाताबाहेर गेली’ तर आपण समुपदेशनाचा – काउन्सेलिंगचा - मार्ग स्वीकारतो. खरं तर आपल्यातील प्रत्येकाने योग्य वेळी ह्या मुलांचे समुपदेशन केले तर ही वेळ येणार नाही. अर्थात ही वेळ आल्यावर, किंवा त्यापूर्वी समुपदेशकाकडे जाणे, हा उत्तम मार्ग आहे. खेड्यात अजूनही ह्या सर्व प्रश्नांवर ‘मुला/मुलीचे लग्न करून टाकणे’ हाच रामबाण उपाय मानला जातो, तो रोगापेक्षा भयंकर आहे, त्यामुळे आईवडिलांची जबाबदारीतून सुटका होते, पण तीही तात्पुरती. मूळ प्रश्न अधिक गंभीर होऊन त्यांच्याकडे परत जातोच. तेव्हा ‘लोक काय म्हणतील?’, ‘भावकीत कळलं तर काय करायचं?’, ‘आपली इज्जत...ह्यांना शाबूत कसं ठेवणार?’ हे सारे प्रश्न गैरलागू ठरतात. तुमचा मुलगा अज्ञान/सज्ञान वयात असा गुन्हा करतो, तेव्हा वाचवायला कुणीच येत नसतं. त्याला निर्दोष सोडवलं तरी मूळ प्रश्न सुटत नसतो. तुमची मुलगी तुमच्या नकळत कुणाशी तरी चॅटिंग करत त्याच्या जाळ्यात सापडते व त्यासोबत पळून जाते, तेव्हा तिची आई, मैत्रीण, मोबाइल, सिनेमा, पाश्चात्त्य संस्कृती यांना दोष देऊन काहीही सिद्ध होत नाही. तुमचा तिच्याशी संवाद तुटला होता, तिला मनातलं सांगायला आईबापभावाबहिणीपेक्षा दुसरा कुणी जवळचा वाटला, एवढाच त्याचा अर्थ होतो.
जाता जाता एवढंच सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही. ह्या ‘वाया गेलेल्या’ मुलांशी थोडं बोलून तर बघा. मराठवाड्यातील ‘त्या’ मुलाच्या बाबांचं कौतुक करायलाच हवं. त्यांनी मला त्यांच्या मुलाशी बोलायला सांगितलं. तो अजिबात बनचुका नव्हता, फक्त नादान होता. त्याला आपल्या आयुष्याबद्दल प्रश्न पडले नव्हते, त्याने कधी भविष्याचा विचार केला नव्हता. ‘पुढे काय करणार?’ ह्या माझ्या प्रश्नावर तो गडबडला. मी त्याला तीन छोट्या गोष्टी सांगितल्या - तुमच्या पिढीसाठी आता नोकऱ्या शिल्लक नाहीत. मागच्या पिढीप्रमाणे तुमच्या पिढीतल्या बायका नालायक नवऱ्यांना आयुष्यभर पोसणार नाहीत, आणि चांगली पोरगी हवी असेल तर तुला आयुष्यात काही कर्तबगारी करून दाखवावी लागेल.
आपला मित्र नक्कीच विचार करायला लागला असेल. त्याला आणि त्याच्यासारख्या असंख्य भरकटलेल्या तरुण मित्रांना विचार करून आपला मार्ग शोधण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! त्यांचा व तुम्हा साऱ्यांचा मित्र, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ संपर्क : ९८३३३४६५३४
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.