आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये राधा जिनींग आणि प्रेसींग या ठिकाणी कापसाच्या गंजीला आग लागून २५०० क्विंटल कापसाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हनुमानदास मुंदडा यांच्या मालकीची राधा जिनींग आणि प्रेसीग आहे.या ठिकाणी खाजगी कापूस खरेदी करून त्याच्या कापूस गाठी केल्या जातात. त्यानुसार सुमारे ३५०० क्विंटल कापूस खरेदी करून ठेवण्यात आला असून त्यावर प्रक्रिया करून गाठी तयार करण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कापूस प्रक्रिया सुरु असलेल्या ठिकाणी अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. तर हळूहळू आग कापूस गंजी जवळ पोहोचली. आग लागल्याचे समजताच अशोक मुंदडा, कुशल मुंदडा यांच्यासह तेथे काम करणाऱ्या कामगारांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. त्यानंतर हिंगोली पालिकेच्या अग्नीशमनदलास पाचारण करण्यात आले. कामगार व अग्नीशमनदलाच्या पथकाच्या प्रयत्नाने दिड तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र तो पर्यंत तब्बल २५०० क्विंटल कापूस जळून तर काही कापूस भिजल्याने नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे अशोक मुंदडा यांनी सांगितले. तर या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. महसुल विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामाही केल्याचे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.