आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरीतील एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजता निदर्शनास आली. या आगीत अंदाजे दाेन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सलग चार तास दोन अग्निशमन बंबांच्या मदतीने आग विझविण्यात आली. ही आग कुणीतरी खोडसाळपणाने लावल्याचा अंदाज गोडाऊन मालक वसीम सईद खान (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर) यांनी वर्तवला आहे.
खान यांच्या मालकीचे जोगेश्वरीत पॉलिथीन, पुठ्ठ्याचे बॉक्स, रेक्झिन आदी मटेरियलचे गोडाऊन आहे. भंगार गोडाऊनमध्ये जमा झालेला माल येत्या आठ दिवसांत विक्रीसाठी हलवण्यात येणार होता. त्यापूर्वीच कुणीतरी पहाटे ४ वाजता गोडाऊनला आग लावली. रेक्झिन, पुठ्ठा आदींनी पेट घेतल्याने आगीच्या ज्वाला गोडाऊनबाहेर पडत असल्याचे अशपाक शेखच्या निदर्शनास आले. शेख याने एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला ही माहिती दिल्यानंतर दोन बंबांच्या मदतीने चार तासांत आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे फौजदार एम.आर. घुनावत यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.